Public Interest Litigation Filed Demanding Separate Space For Mpsc Protest In Pune
जनहित याचिका दाखल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : ‘एमपीएससी आंदोलनासाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी आणि रस्त्यांवरील आंदोलने थांबवावीत,’ अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. एस. एम. जोशी पूल, टिळक चौक आणि शास्त्री रस्त्यावर (अहिल्या स्टडी सेंटर) येथे सुरू असलेल्या आंदोलनांमुळे वाहतूक कोंडीसह दैनंदिन व्यवस्था विस्कळित होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेवर आज, बुधवारी सुनावणी होणार आहे.
पुण्यातील नागरिक अमित बाळू सुपेकर आणि सौरभ प्रभाकर वीरकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकार, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि आंदोलकांसह पाच जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ॲड. रमेश दुबे याचिकाकर्त्यांची बाजू मांडत आहेत.‘एमपीएससी’च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात आंदोलनासाठी २५ सप्टेंबरला परवानगी मागण्यात आली होती. पोलिसांनी २६ सप्टेंबरला काही अटींसह दोन ऑक्टोबरला एस. एम. जोशी पुलावर आंदोलनाला परवानगी दिली होती. मात्र, ३० सप्टेंबरला मुख्यमंत्री आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर २५ प्रतिनिधींनी आंदोलन स्थगित केल्याचे पत्र दिले होते. तरीही तीन ठिकाणी आंदोलने सुरू झाल्याचा दावा याचिकेत केला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘न्यायालयाच्या नोटिशीला राज्य सरकारचे वकील उत्तर देतील; न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल,’ असे सांगितले.