महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष डॉ. विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला आता ‘ पुणे बंद ’च्या आव्हानाची धार आली आहे. आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या भूमिकेविरोधात ‘पुणे बंद’ची हाक देण्याचा इशारा दिल्यानंतर महापौर मंजूषा नागपुरे यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे. ‘रोहित पवार यांनी पुणे शहर बंद करून दाखवावेच,’ अशा शब्दांत नागपुरे यांनी सुनावले. आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांना पूर्ण अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या माध्यमातून पुणेकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना पुणे बंद करणार, असे वक्तव्य केल्यानंतर त्याचा समाचार घेताना ‘पुणेकरांचा बाणा वेगळा आहे. तेही रस्त्यावर उतरतील. पुणेकर काय आहेत, हे त्यांना कळेल,’ अशा शब्दांत नागपुरे यांनी पवार यांना प्रत्युत्तर दिले. आंदोलन करण्याचा अधिकार मान्य असून, कायदेशीर मार्गाने किंवा अन्य पद्धतीने आंदोलन करण्यास विरोध नाही. मात्र, त्याआडून पुणेकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध केला जाईल, असे गणेश बीडकर यांनी सांगितले.