ग्रँड टूरसाठी पुण्यातील १३६ किमी रस्ते चकाचक

Contributed by: पुणे,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
punes 136 km road gets revamped for grand tour cycling competition
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे १३६ किलोमीटरच्या मार्गावरील रस्ते चकाचक करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या मार्गावरील पाणीपुरवठा, ड्रेनेज, एमएनजीएल, महावितरण, आय-ट्रिपल-सी आणि पोलिसांच्या ‘सीसीटीव्ही’सह विविध यंत्रणांची खोदाईची कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिले आहेत. त्यानंतर स्पर्धेच्या मार्गिकेवर कोणत्याही सेवा वाहिनीसाठी खोदकामास परवानगी दिली जाणार नाही.

जानेवारी २०२७मध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या तयारीसाठी महापालिकेत झालेल्या बैठकीत स्पर्धेचा रस्ता (मार्गिका) हा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. चार पॅकेजमध्ये सुमारे १३६ किलोमीटर रस्त्यांची कामे केली जाणार असून, त्यातील ५२ किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. पुनर्डांबरीकरण, चेंबरची पातळी समांतर करणे, पदपथ दुरुस्ती, दुभाजकांची दुरुस्ती, रंगकाम, सुशोभीकरण आणि लँडस्केपिंगचा त्यात समावेश आहे. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा जानेवारी २०२७मध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने शहर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर; तसेच विविध खात्यांचे प्रमुख आणि संबंधित आस्थापनांच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेच्या मुख्य इमारतीत झाली. या बैठकीत स्पर्धेच्या मार्गिकेवरील रस्ते आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या.
सायकल स्पर्धेच्या मार्गिकेवर विविध सेवा वाहिन्यांसाठी सुरू असलेल्या खोदकामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये विविध विभागाच्या कामांचा समावेश आहे.

रस्त्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढविण्यासाठी यंदा ‘व्हीजी-३०’ऐवजी ‘व्हीजी-४०’ ग्रेडचे डांबर वापरण्यात येणार आहे. रस्त्यांचे आयुष्य वाढविण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा आणि वारंवार होणारी खोदाई टाळणे महत्त्वाचे असल्याचे पावसकर यांनी सांगितले.

सायकलपटूंना सलग आणि गुळगुळीत मार्ग मिळावा यासाठी सुमारे २०० ते २२५ गतिरोधक आणि उंचावलेले पादचारी मार्ग तात्पुरते हटविण्यात येणार आहेत. स्पर्धेनंतर ते तातडीने पुन्हा बसविले जातील.