शेतकऱ्यांची बँक म्हणून यवतमाळ जिल्हा बँक ओळखली जाते. या बँकेचा आधार असलेला शेतकरी दुष्काळी झळा सहन करीत आहे. जगण्यासाठीची तरतूदही उरली नसल्याने रोजगाराच्या शोधात शेतकरी भटकू लागला आहे. एकीकडे हे चित्र असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होऊ लागले आहेत. मतदार आपल्याविषयी सकारात्मक राहावे म्हणून देवदर्शनाला आणि पर्यटनाला पाठविले जात आहेत. बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक लढविणाऱ्यांनी कोट्यवधीची उलाढाल करण्यापूर्वी दुष्काळी परिस्थितीचे किमान भान ठेवण्याची गरज आहे.