अणुऊर्जेच्या इंधनाला जादुगोडाचे बळ

Contributed by: जादुगोडा (झारखंड),म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अणुऊर्जेच्या इंधनाला जादुगोडाचे बळ
देशाच्या अणुऊर्जा विस्ताराची तयारी सुरू असतानाच त्यासाठी लागणाऱ्या युरेनियमच्या उत्पादनाला मोठी चालना देण्याची तयारी सुरू झाली आहे. युरेनियम उत्खनन आणि प्रक्रियेत देशाला स्वयंपूर्ण करणाऱ्या युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (यूसीआयएल) २०३६पर्यंत उत्पादन दुप्पट, तर २०४७पर्यंत चौपट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नव्या प्रकल्पांसह सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर दिला जाईल.

‘यूसीआयएल’च्या सहा दशकांच्या प्रवासाचा हिरक महोत्सव जादूगोडा येथे साजरा करण्यात आला. या वेळी अणुऊर्जा आयोगाच्या सदस्या (वित्त) सीमा जैन यांनी देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी ‘यूसीआयएल’च्या योगदानाचे कौतुक केले. अणुऊर्जा क्षेत्राचा विस्तार करताना युरेनियम इंधनाची उपलब्धता वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सहा दशकांत बदलले चित्र

४ ऑक्टोबर १९६७ रोजी स्थापन झालेल्या ‘यूसीआयएल’ने गेल्या ६० वर्षांत युरेनियम उत्खनन आणि प्रक्रिया क्षेत्रात देशाची स्वतःची क्षमता उभी केली. सुरुवातीच्या काळातील मर्यादांपासून आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा हा प्रवास कंपनीसह देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विस्ताराचाही आहे.

अणुभट्टीपर्यंत युरेनियम

‘यूसीआयएल’मध्ये तयार होणाऱ्या युरेनियमचा वापर देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यातही होत आहे. कल्पकम येथे एप्रिलमध्ये देशाच्या दुसऱ्या टप्प्यातील ‘फास्ट ब्रीडर रिॲक्टर’मधून वीज निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. या अणुभट्टीसाठी ‘यूसीआयएल’मध्ये उत्पादित युरेनियमचा इंधन म्हणून वापर करण्यात आल्याची माहिती हैदराबाद येथील अणुइंधन संकुलाच्या अध्यक्षा डॉ. कोमल कपूर यांनी दिली.

यामुळे जादुगोडातील युरेनियम उत्खननाचा संबंध थेट देशाच्या अणुऊर्जा निर्मितीशी जोडला गेला. अणुऊर्जेची क्षमता वाढविण्याच्या आगामी टप्प्यात ‘यूसीआयएल’कडून युरेनियमचा पुरवठा ही महत्त्वाची गरज ठरेल.

नव्या प्रकल्पांची तयारी

युसीआयएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. आनंद राव यांनी कंपनीच्या पुढील वाटचालीची माहिती दिली. वाढती ऊर्जेची गरज लक्षात घेऊन युरेनियम उत्पादन वाढविण्यासाठी नवीन प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाची क्षमता वाढविणे, सुरक्षित उत्खनन आणि पर्यावरणपूरक प्रक्रिया यावर भर दिला जाणार आहे.

अणुऊर्जेच्या विस्ताराचे लक्ष्य मोठे असताना त्यासाठी आवश्यक इंधनाची उपलब्धता हा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

सीमा जैन यांनी या वेळी ‘टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन पायलट प्लांट’ला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. युरेनियम उत्पादन वाढविताना तंत्रज्ञानासोबत सुरक्षितता आणि पर्यावरण व्यवस्थापनालाही तितकेच महत्त्व द्यावे लागणार आहे. देशाची ऊर्जा सुरक्षितता आणि अणुऊर्जेचा विस्तार या दोन्ही दृष्टीने ‘यूसीआयएल’ची जबाबदारी आगामी काळात आणखी वाढणार आहे.