Ancient Kukdeshwar Temple On Kukadi River Visit For Historical Significance And Natural Beauty
कुकडी नदीच्या उगमावरील प्राचीन कुकडेश्वर मंदिर
Contributed by: धर्मेंद्र कोरेे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
जुन्नर : शिवशंकराची विविध रूपांतील पाषाणशिल्पे, विविध देवतांच्या अलंकृत मूर्ती आणि नवग्रहांचे दुर्मीळ कोरीव काम... असा समृद्ध यादवकालीन स्थापत्यकलेचा वारसा जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या उगमस्थळी दिमाखात उभा आहे. राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा लाभलेल्या आणि पुरातत्त्व खात्याकडून नुकतेच संवर्धन पूर्ण झालेल्या या प्राचीन कुकडेश्वर मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी.
जुन्नर-नाणेघाट मार्गावर, जुन्नर शहराच्या पश्चिमेस सुमारे २० ते २२ किमी अंतरावर हे मंदिर वसले आहे. निसर्गसंपन्न डोंगरदऱ्यांच्या कुशीत असलेले हे स्थान स्थानिक आदिवासी बांधवांसह तमाम शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथे कुकडी नदीचे मूळ उगमस्थान असून, ती गुहेसारखी जागा ‘सोनतीर्थ’ म्हणून ओळखली जाते. तेथून काही अंतरावर यादव काळात या मंदिराची उभारणी झाली. काळाच्या ओघात मंदिराचा मूळ कळस ढासळला असला, तरी गर्भगृह, सभामंडप आणि बाहेरील फरसबंद तट यांचे पुरातत्त्व विभागाने उत्तम संवर्धन केले आहे.सहा कोरीव खांबांवर उभे असलेले गूढमंडपाचे छत आणि भिंतींवर विलोभनीय शिल्पे कोरलेली आहेत. यात चतुर्भुज शिव, तांडव मुद्रेतील शंकर, आयुधधारी भैरव, विष्णू, भूवराह, चामुंडा, काली, पार्वती, उमा-महेश्वर आणि गणेशमूर्तींचा समावेश आहे. अष्टकोनी छताच्या पट्टीवर ध्यानस्थ बसलेल्या ४० योगिनींचे अंकन विशेष लक्ष वेधून घेतात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर नवग्रहांची शिल्पे कोरलेली आढळतात. मंदिराबाहेरील भैरवमूर्ती क्षरणामुळे लुप्त झाल्याने तेथे ग्रामस्थांनी नवी मूर्ती स्थापन केली असून, तिच्या दोन्ही बाजूंना मूळच्या पिशाच्च शिळा जपल्या आहेत.
मंदिराच्या डागडुजीसाठी १९६८ मध्ये खडकुंबे येथील गिरजू दमाजी सरोगदे व पूर येथील लिंबा हरी दिवटे यांनी सर्वप्रथम प्रयत्न केले. त्यानंतर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष कै. कृ. रा. साबळे यांनी योगदान दिले. विघ्नहर साखर कारखान्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभारलेल्या ६१ लाखांच्या निधीतून; तसेच नुकत्याच जिल्हा नियोजन समितीच्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून उर्वरित स्थापत्य संवर्धन, संरक्षक भिंत, गळती दुरुस्ती, कुंड दुरुस्ती आणि स्वच्छतागृहांची कामे पूर्ण झाली.
गेल्या काही वर्षांपासून मारुती दिवटे आणि आता नव्यानेच रुजू झालेले योगी भूतनाथ हे दोघेजण मंदिरात नित्यपूजा करतात. मंदिरात महाशिवरात्र आणि दत्तजयंती हे उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. महाशिवरात्रीकाळात अखंड हरिनाम सप्ताह, काकडा, हरिपाठ, कीर्तन अशा विविध उपक्रमांतून आठ दिवस साजरा केला जातो. यानिमित्त पूर शिरोली ग्रामस्थ आणि कुकडेश्वर भक्तपरिवाराकडून भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते.