अभिषेक, अदिती, आर्शिया यांना दुहेरी मुकुट

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,पुणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अभिषेक, अदिती, आर्शिया यांना दुहेरी मुकुट
अभिषेक गुळभिले , अदिती हरगुडे , आर्शिया पवार यांनी शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला.

म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. वाघोलीतील भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) अदिती हरगुडेने १७ वर्षांखालील मुलींच्या १५०० आणि ३००० मी. धावण्याच्या शर्यतीत बाजी मारली. ३००० मी. धावण्याच्या शर्यतीत अदितीने ११ मिनिटे व ५५.०६ सेकंद वेळ नोंदवली. बीजेएसच्याच अक्षता धुमाळने दुसरा, तर ‘पीआयसीटी’च्या दर्शिता बोगावतने तिसरा क्रमांक मिळवला. १५०० मी. धावण्याच्या शर्यतीतही या तिघींनीच पहिले तीन क्रमांक मिळवले. अदितीने ५ मिनिटे व १८.६ सेकंद वेळ नोंदवली. अक्षताने ५ मिनिटे व २२.५ सेकंद, तर दर्शिताने ५ मिनिटे व ३९.५ सेकंद वेळ नोंदवली.
एस. पी. कॉलेजच्या आर्शिया पवारने १९ वर्षांखालील मुलींच्या ३००० आणि १५०० मी. धावण्याच्या शर्यतीत बाजी मारली. आर्शियाने ३००० मी. धावण्याची शर्यत १२ मिनिटे व २५.८ सेकंद वेळ नोंदवून जिंकली. ‘एसपी’च्या अदिती घुगेने दुसरा, तर ‘बीजेएस’च्या अदिती भडने तिसरा क्रमांक मिळवला. तसेच, आर्शियाने १५०० मी. शर्यत ५ मिनिटे व ३०.२ सेकंद वेळ नोंदवून जिंकली. अदिती भडने दुसरा, तर बाल शिक्षण मंदिरच्या अर्वा स्वामीने तिसरा क्रमांक मिळवला.

श्री. शाहू मंदिर कॉलेजच्या अभिषेक गुळभिलेने ३००० आणि १५०० मी. धावण्याची शर्यत जिंकली. ३००० मी. धावण्याच्या शयर्तीत अभिषेकने ९ मिनिटे व ११ सेकंद वेळ नोंदवून बाजी मारली. ‘एसपी’च्या अभिनवसिंहने दुसरा, तर ‘विद्यावर्धिनी’च्या प्रथमेश भोसलेने तिसरा क्रमांक मिळवला. तसेच, १५०० मी. शर्यतीत अभिषेकने ४ मिनिटे व ११.९ सेकंद वेळ नोंदवून बाजी मारली. अवनीश मुळेने दुसरा, तर प्रथमेश भोसलेने तिसरा क्रमांक मिळवला.

‘सेंट व्हिन्सेंट’च्या संजना चैनानीने १७ वर्षांखालील मुलींच्या गोळाफेकमध्ये बाजी मारली. तिने १३ मीटर कामगिरी नोंदवली. ‘माउंट कार्मेल’च्या जयनी पाटीलने दुसरा, तर विभुती मावळेने तिसरा क्रमांक मिळवला.

निकाल : १७ वर्षांखालील मुले : ३००० मी. धावणे : महंमद अमन निजामुद्दीन शेख - ११ मि. ३२.३६९ से. (सेवासदन स्कूल), अंश शृंगारे (लॉयला स्कूल), प्रतीक आव्हाळे (प्रॉडिजी स्कूल). १५०० मी. धावणे : नील सुतार - ४ मि. ५०.८ से. (बी. एम. सी. सी.), आदित्य तोंडे (बाल शिक्षण मंदिर), अर्थ सांकलेचा (विखे पाटील स्कूल).

स्पर्धेतील चौदा वर्षांखालील मुलींत आर्यन वर्ल्ड स्कूलची तेजल लिगाडे वेगवान धावपटू ठरली. तेजलने १०० मी. धावण्याची शर्यत १३.४ सेकंद वेळ नोंदवून जिंकली. ‘अभिनव’च्या बतुल रेतीवालाने दुसरा, तर आर्मी पब्लिक स्कूलच्या ओवी काळेने तिसरा क्रमांक मिळवला. तसेच, सतरा वर्षांखालील मुलांत एरिन नगरवाला स्कूलचा फरहान अब्दुल फरहान शेख वेगवान धावपटू ठरला. त्याने १०० मी. शर्यत १२.२ सेकंद वेळ नोंदवून जिंकली. ‘अभिनव’च्या अवधूत देशमुखने दुसरा, तर महाराष्ट्र विद्यालयाच्या स्वयम गोळेने तिसरा क्रमांक मिळवला.

अभिषेक, अदिती, आर्शिया यांना दुहेरी मुकुट