बरेली : उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी खासदार आणि ओबीसी नेते धर्मेंद्रकुमार कश्यप यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपल्याविरोधात काम करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई न केल्याने ते नाराज आहेत. सोशल मीडियावर ‘टाटा बाय-बाय’ पोस्ट करून त्यांनी नाराजी व्यक्त केली. आवळा लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या कश्यप यांनी समर्थकांशी चर्चा करून लवकरच समाजवादी पक्षात परतण्याचा किंवा नवीन निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे.
तुर्कीयेतील इझमीरच्या महापौर सत्ताधारी पक्षातइस्तंबूल : तुर्कीयेचे तिसरे मोठे शहर असलेल्या इझमीरचे महापौर जेमिल तुगे यांनी अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांच्या सत्ताधारी ‘एकेपी’ पक्षात प्रवेश केला. गेली दोन दशके हे शहर मुख्य विरोधीपक्ष ‘सीएचपी’कडे होते. न्यायालयीन कारवाई आणि अंतर्गत वादामुळे तुगे यांनी जूनमध्ये विरोधकांची साथ सोडली होती.
अंतरिम जामिनात हस्तक्षेपास नकार
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्या अंतरीम जामिनात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने प्रधान यांना प्रचारासाठी २० ऑक्टोबरपर्यंत जामीन मंजूर केला होता. याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला; मात्र जामीन वाढवण्याची मागणी झाल्यास राज्य सरकारला उच्च न्यायालयात बाजू मांडण्याची मुभा दिली आहे.
पोलंडमधील शाळेवर हल्ल्यात सात जखमी
वॉर्सा : पोलंडची राजधानी वॉर्साच्या उत्तरेकडील एका शाळेत बुधवारी झालेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. तो याच शाळेतील विद्यार्थी होता. हा हल्ला सकाळी ११ वाजता झाला. हल्लेखोराने धारदार वस्तू वापरली होती. मात्र, याबाबत अधिक तपशील देण्यात आलेला नाही.जखमी झालेल्या सात जणांमध्ये शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अटक केली जात असताना संशयित हल्लेखोरही जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याच्या जखमा किती गंभीर आहेत, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
पाकमध्ये अठरा दहशतवादी ठार
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुरक्षादलांनी १८ दहशतवाद्यांना ठार केले. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यात गुप्तचर माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी ‘फितना अल-खवारिज’चे १३ दहशतवादी ठार केले. बलुचिस्तानमधील मस्तंग जिल्ह्यात आणखी पाच दहशतवादी ठार झाले. घटनास्थळावरून शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.