कर्जे महागली

Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कर्जे महागली
भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दरात पाव टक्का वाढ केली. सुमारे चार वर्षांनंतर ही वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम म्हणून येत्या काळात गृह, वाहन व वैयक्तिक कर्जांचे दर वाढणार आहेत. रेपो दरात पाव टक्का वाढ केल्यानंतर काही तासांतच इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांनी कर्जदरांत वाढ केली.

कर्जे महाग झाल्याने मध्यमवर्गीयांचे स्वतःचे घर घेण्याचे, वाहनखरेदीचे स्वप्न पूर्ण होणे कठीण होईल. वाढती महागाई आणि कमजोर होत चाललेल्या रुपयामुळे धोरणात्मक बदल झाल्याचे संकेत देत आणखी दरवाढ होऊ शकते असेही आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले. पतधोरण ठरवताना आरबीआयने सर्वसमावेशक धोरण स्वीकारले होते. मात्र यापुढे अर्थव्यवस्थेबाबत टप्प्याटप्प्याने कठोर भूमिका (‘कॅलिब्रेटेड टाइटनिंग‘) घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे जागतिक परिस्थितीचे प्रतिबिंब म्हणून देशाची अर्थव्यवस्था संकटात चालल्याचे जणू सूतोवाच मल्होत्रा यांनी केले.
सहा सदस्यीय पतधोरण समितीने एकमताने रेपो दर वाढवण्याच्या बाजूने मतदान केले. डिसेंबर २०२४ मध्ये गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच अशी वाढ आहे. ‘नजीकच्या काळात दरकपात शक्य नाही आणि पुढील धोरणात्मक कृती केवळ दरवाढ किंवा स्थगिती असू शकते, जी बदलत्या परिस्थिती आणि दृष्टिकोनावर अवलंबून असेल,’ असे मल्होत्रा यांनी एमपीसीचे निर्णय जाहीर करताना म्हणाले.

दरम्यान, रेपो दरांत वाढ केल्यानंतर दिवसभरात पंजाब नॅशनल बँकेने कर्जदर ८.३५ टक्के केला. तर इंडियन बँकेने रेपोसंलग्न बेंचमार्क कर्जदर विद्यमान ७.९५ टक्क्यांवरून ८.२० टक्के केला. ही दरवाढ आज, ८ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांनीही व्याज दरांत वाढ केली.

संबंधित बातम्या पान ८