भारतीय युवा संघाचा दहा विकेटनी विजय

Contributed by: वृत्तसंस्था,अहमदाबाद|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भारतीय युवा संघाचा दहा विकेटनी विजय
डावखुरा फिरकीपटू तन्मय बालोदाच्या आठ विकेटच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील गटाच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा १० विकेटनी पराभव केला आणि मालिका २-० अशी जिंकली.

तिसऱ्या दिवशी ४ बाद ८६ धावांवरून पुढे खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १५१ धावांत गारद झाला. त्यामुळे भारताला विजयासाठी केवळ ११ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठले. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात ३१५ धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाला पहिला डाव १७४ धावांत गुंडाळून भारताने १४१ धावांची आघाडी घेतली होती. लक्ष्य रायचंदानीने ग्रीनच्या गोलंदाजीवर दोन चौकार लगावून पहिल्याच षटकातील पाच चेंडूंत भारताला लक्ष्य गाठून दिले. राजकोट येथे झालेल्या पहिल्या युवा कसोटीत भारताने एक डाव आणि ४८ धावांनी विजय मिळवला होता.
तन्मयची चमक

दुसऱ्या युवा कसोटीत तन्मय भारताचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. हरियाणाच्या तन्मयने दोन डावांत अनुक्रमे ३२ धावांत ६ आणि ४१ धावांत ८ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून ब्लॅक कॅटलने ६३ धावांची खेळी केली नसती, तर भारत डावाने जिंकला असता.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - सर्व बाद १७४ आणि दुसरा डाव - सर्व बाद १५१ (ब्लॅक कॅटल ६३, एलि ब्रेन ३९, तन्मय बालोदा ८-४१, प्रियांशू सिंह २-२५) पराभूत वि. भारत - पहिला डाव - सर्व बाद ३१५ आणि बिनबाद ११.