महापौर तावडेंना एक हजाराचा दंड

Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
mayor tawde fined one thousand attempt to delay trial
महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत दोन शिक्षकांना मारहाण केल्याच्या एक दशकापूर्वीच्या घटनेच्या खटल्याच्या सुनावणीला पुन्हा गैरहजर राहिल्याबद्दल मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एक हजार रुपयांचा दंड लावला. तसेच पुढील सुनावणीला गैरहजर राहिल्यास वॉरंट जारी करण्यात येईल आणि जामीन रद्द करण्यात येईल, असा इशाराही अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साली यांनी दिला.

‘मुंबईच्या महापौर या शहराच्या प्रथम नागरिक असल्याने त्यांचे वेळापत्रक व्यस्त असते’, असे म्हणणे तावडे यांच्यातर्फे ॲड. दुर्गा राजपूत यांनी मांडले. तर, अन्य दोन आरोपींनी आपण सामाजिक कार्यकर्ते असून, आपापल्या कामामुळे आपले वेळापत्रक व्यस्त असल्याचे सांगत उपस्थितीतून सूट मागितली. मात्र, ‘हे प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आरोपी जाणीवपूर्वक न्यायालयात हजर राहणे टाळत आहेत’, असा युक्तिवाद करत सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी या मागणीला विरोध दर्शवला. ‘आरोपी गैरहजर राहत असल्याने खटला लांबवण्याचा प्रयत्न दिसून येतो’, असे न्यायालयाने नोंदवले.