एसटीचा पास आता ऑनलाइन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
new online facility for st pass passengers can now obtain tickets from home
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजना ऑनलाइन केली आहे. त्यामुळे चार किंवा सात दिवसांचा पास घरबसल्या ऑनलाइन काढता येणार आहे.

एसटीच्या अधिकृत संकेतस्थळासह मोबाइल ॲपवर ही सुविधा आहे. हा पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाइलमधील पीडीएफ स्वरूपात दाखविता येईल. ऑनलाइन पासवर क्यूआर कोड देण्यात येणार असून, प्रवासाच्या वेळी वाहकाच्या ‘ईटीआयएम’ मशिनद्वारे त्याची तपासणी केली जाणार आहे. प्रवाशाच्या ओळखपत्राची पडताळणी केल्यानंतरच प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. ऑनलाइन सुविधेमुळे विशेषतः सुट्टीच्या काळात आणि पर्यटन हंगामात पास काढणे सुलभ होणार असून, आगारांमधील गर्दीही कमी होण्यास मदत होणार आहे. या सुविधेची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश विभागीय कार्यालये आणि आगारांना देण्यात आले आहेत.