पिंपरी : फरारी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राबविलेल्या १५ दिवसांच्या ‘ मिशन वाँटेड ’मुळे गुन्हेगारी वर्तुळात घबराट पसरली आहे.
पोलिस ठाणी आणि गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत २४७ आरोपींना पकडण्यात यश मिळाले आहे. गुन्हे शाखेच्या अंतर्गत स्पर्धेत गुंड विरोधी पथकाने १३२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. युनिट तीनने १०३ गुणांसह दुसरा; तर युनिट एक आणि युनिट दोनने प्रत्येकी ८४ गुण मिळवून संयुक्त तिसरे स्थान मिळविले. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २७ जुलै ते १२ ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात आली.कारवाईत पोलिस ठाण्यांनी १४०; तर गुन्हे शाखेने १०७ आरोपी पकडले. याशिवाय मृत्यू, प्रकरण, अटकपूर्व कारवाई किंवा दुबार नावे अशा कारणांमुळे ७९ प्रकरणे कमी झाली आहेत. त्यामुळे एकूण ३२६ प्रकरणांचा निपटारा होऊन आता दोन हजार ३४१ आरोपींचा शोध बाकी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.