‘राउंडग्लास’ची जेतेपदाची हॅट् ट्रिक

Contributed by: पुणे,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘राउंडग्लास’ची जेतेपदाची हॅट्‌ट्रिक
पंजाबच्या राउंडग्लास अकादमीने १६ वर्षांखालील मुलांच्या ‘एसएनबीपी’ अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले.

म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा झाली. अंतिम लढतीत राउंडग्लास संघाने उत्तर प्रदेशच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स कॉलेज संघावर ३-२ अशी मात केली. २०२४ आणि २०२५मध्ये राउंडग्लास संघाने ही स्पर्धा जिंकली होती. साहजिकच राउंडग्लास संघ या वेळी जेतेपदाची हॅट् ट्रिक साजरी करणार का, याबाबत औत्सुक्य होते. २६व्या मिनिटाला सन्मुखसिंगने गोल नोंदवून राउंडग्लास संघाचे खाते उघडले. मात्र, पुढच्याच मिनिटाला सुनील पालने गोल नोंदवून राउंडग्लास संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर, दोन्ही संघांत आघाडी मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. ४१व्या मिनिटाला अभिजितसिंगने गोल नोंदवून राउंडग्लास संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ, सन्मुखने (५२ मि.) आणखी एक गोल नोंदवून राउंडग्लास संंघाच्या आघाडीत भर घातली. मेजर ध्यानचंद संघाच्या खेळाडूंनी गोल नोंदवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. ५६व्या मिनिटाला शिवम यादवने गोल नोंदवून आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, त्यानंतर राउंडग्लास संघाने ३-२ अशा आघाडीसह जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत आर्मी बॉइज स्पोर्ट्स कंपनीने ओडिशाच्या एस. ए. आय. एल. अकादमीवर २-१ अशी मात केली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘एलएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे चेअरमन डॉ. डी. के. भोसले यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘एसएनबीपी’च्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, कार्यकारी संचालक देवयानी भोसले, डॉ. ऋतुजा भोसले, संचालक डॉ. अमय मलप्पुरम, डॉ. जयश्री वेंकटरमण, डॉ. लक्ष्मी प्रसन्ना, ‘एसएनबीपी’चे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. फिरोझ शेख उपस्थित होते.

मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स कॉलेज संघाच्या रोमित पालला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. ‘बेस्ट फॉरवर्ड’ म्हणून अभिजितसिंग (राउंडग्लास), ‘बेस्ट हाफ’ म्हणून विशाल राजभरला (मेजर ध्यानचंद संघ), तर बेस्ट गोलकीपर म्हणून कृष्णा मौर्यला (मेजर ध्यानचंद संघ) गौरवण्यात आले. या वेळी कुकू वालिया यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.