विभागातील २८ महसूल कर्मचाऱ्यांना पदोन्नती

Contributed by: नागपूर,म.टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
28 revenue employees promoted to naib tehsildar in revenue department
नागपूर विभागातील सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातील २८ कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार (गट-ब, राजपत्रित) संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

सन २०२५-२६ च्या निवडसूचीतून ८ सहायक महसूल अधिकारी आणि १५ मंडळ अधिकारी, अशा एकूण २३ कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात नियमित पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती कोट्यातील उपलब्ध पदांवर ही पदोन्नती देण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत. यामध्ये २३ कर्मचाऱ्यांना नियमित पदोन्नती, यापूर्वी तदर्थ पदोन्नती मिळालेल्या ४ कर्मचाऱ्यांची पदोन्नती नियमित, तर दिव्यांग प्रवर्गातील एका कर्मचाऱ्याला काल्पनिक पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे.
२०२३-२४ च्या निवडसूचीतून यापूर्वी नायब तहसीलदार संवर्गात तदर्थ पदोन्नती मिळालेल्या चार सहायक महसूल अधिकाऱ्यांची पदोन्नती सन २०२५-२६च्या पदोन्नती कोट्यात नियमित करण्यात आली आहे. दिव्यांग प्रवर्गातील एका सहायक अधिकाऱ्याला नायब तहसीलदार संवर्गात काल्पनिक पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर करण्यात आला आहे. विविध अटींच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात आल्या असून संबंधित न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहेत.