Nana The Ideal Of Sincerity And The Mysterious Journey Of Acting Excellence
सच्चेपणा हीच त्याची खरी ओळख होती
Contributed by: अशोक सराफ,ज्येष्ठ अभिनेते|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
झ्या आयुष्यातली अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. माझा अत्यंत जवळचा, जीवलग मित्र अचानक निघून गेला. अजूनही या धक्कादायक बातमीवर माझा विश्वास बसत नाही. इतका फिट, शिस्तबद्ध आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणारा माणूस असा अचानक जाईल, याची कल्पनाही करता येत नाही.
व्यायाम करून शरीर घडवलेला, आयुष्यभर स्वतःला सांभाळणारा माणूस होता नाना . माझी आणि नानाची मैत्री खूप जुनी. आमच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात जवळपास एकाच काळात झाली. ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकापासून मी त्याचा प्रवास पाहत आलोय. त्या नाटकात त्याने साकारलेला दलालाचा रोल आजही माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. त्या व्यक्तिरेखेतील लाचारी, बारकावे आणि त्याने दिलेले वेगळेपण पाहून आम्ही थक्क व्हायचो. अभिनयाच्या जोरावर तो कुठल्या कुठे पोहोचला. त्याने स्वतःची एक स्वतंत्र शैली निर्माण केली. साध्यासुध्या भूमिकांनाही तो वेगळा आयाम देत असे. कॉमेडी असो किंवा गंभीर भूमिका, प्रत्येक व्यक्तिरेखा तो स्वतःच्या पद्धतीने जिवंत करत असे.नानाचा स्वभाव अत्यंत थेट आणि सरळ होता. आवडले तर आवडले, नाही आवडले तर नाही, हे तो तोंडावर सांगायचा. त्यामुळे अनेकांना तो उर्मट, गर्विष्ठ किंवा रागीट वाटायचा. पण प्रत्यक्षात तो अतिशय मऊ, सौम्य मनाचा आणि मदतीसाठी धावून जाणारा माणूस होता. कोणावर अन्याय होत असल्याचे त्याच्या लक्षात आले, तर तो शांत बसत नसे. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्याने समाजासाठी केलेले कामही खूप मोठे आहे. त्याचा सच्चेपणा हीच त्याची खरी ओळख होती.