विदर्भातील गरबा मंडपांत गैरहिंदूंना हवी प्रवेशबंदी

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,नागपूर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
proposal for entry ban of non hindus in garba mandaps of vidarbha
नवरात्रौत्सवाच्या काळात गरबा मंडपांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व गरबास्थळांवर आधार कार्ड तपासूनच प्रवेश दिला जावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद-दुर्गा वाहिनीच्या विदर्भ प्रांतने केली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

दुर्गा वाहिनीच्या विदर्भ प्रांत संयोजिका आकांक्षा वर्मा म्हणाल्या, ‘नवरात्रौत्सव आणि गरबा हा देवीच्या आराधनेचा पवित्र सण आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ओळख लपवून होणारी घुसखोरी आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत आहेत. खबरदारी गरजेची आहे. तसेच गरबा मंडपांमध्ये बॉलिवूडच्या अश्लील गाण्यांवर आणि विकृत अंगविक्षेपांवर तत्काळ बंदी घालून केवळ भक्तीगीते, भजन आणि पारंपरिक गरबा गीतेच वाजवण्यात यावीत.’ ‘आमचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणे नसून भगिनींची सुरक्षा आणि संस्कृतीचे पावित्र्य जपणे हाच आहे. प्रशासनाने या निवेदनाची तत्काळ गंभीर दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात,’ असे विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताचे प्रचार-प्रसार प्रमुख निरंजन रिसालदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.