‘‘एसआयआर’ अंतर्गत मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया भाजपविरोधी मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठीच राबवली जात आहे,’ असा आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोग लोकशाहीला कमकुवत करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बेंगळुरूमध्ये विविध नागरी संघटनांनी आयोजित केलेल्या ‘पीपल्स ट्रिब्युनल’मध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाला यूट्यूबर ध्रुव राठी आणि अभिनेता प्रकाश राज उपस्थित होते. दीपके म्हणाले, की मतदारयादीतून मृत घोषित करून नावे वगळण्यात आलेले अनेक नागरिक प्रत्यक्षात जिवंत असून, ते कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यासह मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित निर्देशांवर मतदारांची नावे वगळली,’ असा आरोप दीपके यांनी केला. ‘रा. स्व. संघाची विचारधारा आंबेडकर आणि पेरियार यांच्या तत्त्वांना मानत नाही,’ असेही ते म्हणाले. २०२४च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देऊन दीपके म्हणाले, की भाजपला अपेक्षित बहुमत न मिळाल्यानंतर विरोधी मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न सुरू झाला. देशभरात १३ कोटी व कर्नाटकमध्ये सुमारे एक कोटी मते वगळल्याचा दावाही दीपके यांनी केला. लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून मतांचे संरक्षण केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.ध्रुव राठी आंदोलनात
‘सीजेपी’च्या आंदोलनात सहभागी झालेल्या युट्यूबर ध्रुव राठी याने ‘एसआयआर’ प्रक्रियेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘मतचोरी’ हा सर्व मतदारांचा प्रश्न असल्याचे सांगत त्याने भाजप समर्थकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
कोलकाता : ‘ज्ञानेशकुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी ‘सीजेपी’ने दहा ऑक्टोबरला दिल्लीत जंतरमंतरवर आयोजित केलेल्या आंदोलनात मी सहभागी होऊ शकते; मात्र अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल,’ असे पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर बंगालमधील एसआयआर त्रुटी, मतदारयादीतील नावे वगळणे आणि कथित गैरप्रकारांवरून पुन्हा टीकाही केली.