भारतीय हवाई दलाची असामान्य झेप

Contributed by: वृत्तसंस्था,गाझियाबाद|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भारतीय हवाई दलाची असामान्य झेप
‘भारतीय हवाई दलाने १९३२मध्ये स्थापनेपासून आजवर नेटवर्क-केंद्रित आणि बहुआयामी दल म्हणून असामान्य झेप घेतली आहे. देशासमोरील कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी हवाई दल पूर्णपणे सज्ज आहे,’ अशी ग्वाही हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी गुरुवारी दिली.

९४व्या हवाई दल दिनानिमित्त हिंडन हवाई तळावर आयोजित समारंभात ते बोलत होते. ‘जगाच्या विविध भागांत सुरू असलेल्या संघर्षांमधून हे स्पष्ट झाले आहे, की राष्ट्राच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी हवाई सामर्थ्य हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे,’ असे सिंग यांनी सांगितले.
‘ ऑपरेशन सिंदूर ’चा संदर्भ देताना त्यांनी भारतीय हवाई दलाच्या अचूक हल्ल्यांची आणि सक्षम हवाई संरक्षण क्षमतेची प्रशंसा केली. ‘युद्धकारवायांमध्ये वेग आणि परिणामकारकता सिद्ध करण्यात हवाई दल यशस्वी ठरले आहे. हवाई दलाची खरी ताकद हवाई योद्ध्यांमध्ये आहे. दल सतर्क, कटिबद्ध असून, कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

भारतीय हवाई दलाची स्थापना आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या हवाई योद्ध्यांच्या स्मरणार्थ दर वर्षी आठ ऑक्टोबर रोजी हवाई दल दिन साजरा केला जातो.

वाराणसीत शक्तिप्रदर्शन

गाझियाबाद : भारतीय हवाई दलाच्या ९४व्या वर्धापनदिनानिमित्त २५ ऑक्टोबर रोजी वाराणसी येथे औपचारिक हवाई कसरती होणार असल्याचे समजते. ‘अभेद्य, अजिंक्य आणि अचूक’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना असणार आहे.