शेतीच्या वादातून चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे एकाने भावासह पुतण्या आणि जन्मदात्या आईचे तिहेरी हत्याकांड घडविले. घरासमोरच चाकूने सपासप वार करून तिघांची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
रणजित संजय सूरडकर (वय २३), संजय फत्तेसिंग सूरडकर (वय ४८) व सरस्वती फत्तेसिंग सूरडकर (वय ७०) अशी मृतांची नावे आहेत. तर मारेकरी दीपक फत्तेसिंग सूरडकर हा फरार झाला असून, पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहेत. शेतीच्या वादातून दीपकने आई सरस्वती, भाऊ संजय आणि पुतण्या रणजित यांच्यावर राग काढत त्यांना कायमचे संपविले. आईने दीपकच्या नावावरील शेती संजयच्या नावाने केल्याने संतापून त्याने हे हत्याकांड घडविल्याची माहिती समोर येत आहे. तिघांची हत्या केल्यानंतर आरोपी दीपक हा भाऊ संजयची मुलगी वैष्णवी अनंता मोरे हिला ठार मारण्यासाठी सोमठाण्यातून जवळच असलेल्या दिवठाणा येथे गेला होता. मात्र, मुलगी शेतात गेल्याने हल्ल्यातून बचावल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. गावात तणाव निर्माण झाला असून, तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.