‘अनुयायांसाठी तात्पुरते निवारा केंद्र, पुरेशा प्रकाशासाठी एलईडी व्यवस्था, शुद्ध पाण्याचे नियोजन, स्वच्छता आणि फिरती शौचालये यांसारख्या सुविधांची निर्मिती करण्यात येत असून ही कामे वेळेत पूर्ण करा’, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. दीक्षाभूमी परिसरात अनुयायांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करता याव्या यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या ८ कोटी ९२ लक्ष रुपयांचा आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी प्रदान केली आहे.
धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामे पूर्ण करून येथे येणाऱ्या अनुयायांसाठी उत्तम सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीस पोलिस उपायुक्त एस. ऋषिकेश रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच संबंधित विभाग प्रमुख व दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. अनुयायांसाठी उभारण्यात येणाऱ्या विविध सुविधांच्या अंमलबजावणीवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त आयोजित दसरा महोत्सवादरम्यान येथे देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. यादरम्यान येथील वीज पुरवठा अखंडित सुरू राहावा तसेच दीक्षाभूमीचे मुख्य प्रवेशद्वार (पूर्व गेट), सभागृह, राहाटे कॉलनी, पीकेव्ही वसतिगृह, आयटीआय कॉलेज तसेच परिसरात ठिकठिकाणी वीज जोडणी व देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या.
दीक्षाभूमी परिसर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर, सामाजिक न्याय भवन, आयटीआय परिसर, माता कचेरी, बेझन बाग, ड्रॅगन पॅलेस, कुर्वेज शाळा परिसर आदी ठिकाणी जर्मन हँगर स्वरूपाचे आधुनिक, सुविधाजनक व प्रशस्त डोम उभारण्यात येणार आहेत. त्याची पाहणी करत येथील परिसरात इंटरनेट व वीज जोडणी, स्वच्छतागृहे व विविध सुविधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देश दिले.