Critique Of Atheism A Discourse By Richard Dawkins
निरीश्वरवादाची चिकित्सा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
लेखक :
प्रकाशक :पाने :
किंमत : ३
चर्ड डॉकिन्स यांच्या ‘द गॉड डिल्युजन’ या पुस्तकामुळे धर्म, विज्ञान, उत्क्रांतीवाद आणि निरीश्वरवाद या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. यात डॉकिन्स जीवशास्त्राबाहेरील अनेक प्रश्न उपस्थित करतात. देवाची संकल्पना माणसाला का आवश्यक वाटते? देवाच्या अस्तित्वासाठी कोणते युक्तिवाद केले जातात? धर्माची निर्मिती आणि प्रसार कसा झाला? नैतिकतेसाठी देव आवश्यक आहे का? आणि विज्ञानाच्या युगात धर्माचे स्थान काय? या पुस्तकात विज्ञानापेक्षा तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, उत्क्रांतीवादी मानसशास्त्र, सामाजिक आणि सांस्कृतिक भाष्य अधिक आहे.
डॉकिन्स यांच्या युक्तिवादाचा मध्यवर्ती प्रश्न साधा आहे, देव ही गृहीत कल्पना का मानायची? धार्मिक विचारांमध्ये अनेकदा विश्वाच्या गुंतागुंतीकडे पाहून त्यामागे कोणाचे तरी नियोजन असण्याची कल्पना केली जाते. डॉकिन्स यांना यात एक मूलभूत प्रश्न दिसतो. विश्वाच्या गुंतागुंतीच्या स्पष्टीकरणासाठी देव मान्य करायचा असेल, तर त्या देवाचे स्पष्टीकरण काय? म्हणजे एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दुसरा प्रश्न उपस्थित होतो. हा या पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेला भाग आहे.
डॉकिन्स यांनी येथे उत्क्रांतीवादाची केलेली चर्चा महत्त्वाची आहे. नैसर्गिक जगातील गुंतागुंत ही एखाद्या नियोजकाच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, या कल्पनेला डार्विनच्या सिद्धान्ताने आव्हान दिले होते. जीवसृष्टीतील गुंतागुंत दीर्घकाळ चालणाऱ्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून निर्माण झाली, असे डार्विन यांचे म्हणणे आहे. डॉकिन्स येथे प्रभावी विज्ञानलेखक ठरतात. जटिल वैज्ञानिक संकल्पना उदाहरणे, उपमा आणि तर्काच्या साहाय्याने सर्वसामान्य वाचकाला समजावून सांगण्याची त्यांची क्षमता विलक्षण आहे.
पुस्तकाचा दुसरा महत्त्वाचा भाग धर्माच्या उत्पत्तीचा आहे. माणसाच्या मेंदूची उत्क्रांती , कार्यकारणभाव शोधण्याची त्याची प्रवृत्ती, अदृश्य शक्तींवर विश्वास ठेवण्याची क्षमता आणि सामाजिक अनुकरण यांच्याशी धार्मिक श्रद्धांचा संबंध आहे, असे डॉकिन्स यांचे म्हणणे आहे.
धर्म हा एखाद्या नियोजित पद्धतीने निर्माण केलेला सामाजिक-संस्थात्मक प्रयोग नसून माणसाच्या मानसिक आणि सामाजिक प्रक्रियांमधून निर्माण झालेल्या अनेक कल्पनांचा परिणाम आहे. धर्माच्या प्रसारासाठी ते ‘मेम’ या संकल्पनेचाही वापर करतात. ही कल्पना वाचकाला धर्माकडे श्रद्धेच्या आतून नव्हे, तर मानववंशशास्त्रीय आणि उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडते. यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, देवावर विश्वास नसेल, तर माणूस नैतिक कसा राहील? डॉकिन्स यांचे उत्तर स्पष्ट आहे. नैतिकतेसाठी देवाची आवश्यकता नाही. माणूस सामाजिक प्राणी आहे. सहकार्य, परहितभावना, सहानुभूती, वेदनेची जाणीव आणि समूहजीवन यांसारख्या मानवी गुणांचा विकास धार्मिक श्रद्धांपूर्वीच्या मानवी समाजांमध्येही झालेला असू शकतो. त्यामुळे ‘देव शिक्षा करेल म्हणून चांगले वागणे’ ही नैतिकतेची पायाभूत रचना नाही.
‘धर्माशिवाय नैतिकता शक्य आहे का?’ हा प्रश्न केवळ धर्म विरुद्ध निरीश्वरवाद असा नाही. तो मानवी मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि विवेक यांच्या संदर्भात विचारण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात म. फुले, आगरकर, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. दाभोलकर आणि विविध विवेकवादी-सामाजिक सुधारणांच्या परंपरांचा दीर्घ इतिहास आहे. त्यामुळे श्रद्धा, धर्म, जात, कर्मकांड, तर्क, विज्ञान आणि सामाजिक न्याय यांवरील चर्चा येथे नवीन नाही.
धर्म म्हणजे केवळ अंधश्रद्धा, धर्मग्रंथांतील शब्दांवर विश्वास आणि मूलतत्त्ववाद एवढेच आहे का, हा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. धर्मामध्ये तत्त्वज्ञान आहे, नैतिक विचार आहेत, कलाविष्कार आहेत, सामाजिक संस्था आहेत, दुःखाचा अर्थ लावण्याच्या पद्धती आहेत आणि मानवी अस्तित्वाच्या अंतिम प्रश्नांशी झुंज देण्याच्या परंपरा आहेत. डॉकिन्स या व्यापक धार्मिक अनुभवापेक्षा धर्माच्या अविवेकी किंवा सामाजिकदृष्ट्या घातक आविष्कारांवर अधिक टीका करतात.
आजच्या काळात सामाजिक माध्यमे, धार्मिक ध्रुवीकरण, विज्ञानविरोधी दावे, छद्मविज्ञान, धर्माच्या नावाने होणारे राजकारण आणि दुसऱ्या बाजूला कोणत्याही धार्मिक अनुभवाकडे केवळ अंधश्रद्धा म्हणून पाहण्याची प्रवृत्ती- या दोन्ही टोकांमध्ये विवेकपूर्ण चर्चा अनेकदा हरवते. ती या पुस्तकामुळे पुन्हा पृष्ठभागावर आली आहे.
हे पुस्तक धर्माची अंतिम चिकित्सा आहे, असे म्हणणे अतिशयोक्त ठरेल. त्याचप्रमाणे ते केवळ आक्रमक निरीश्वरवादी प्रचारलेखन म्हणून बाजूला करणेही योग्य नाही. विज्ञानाच्या युगात धर्माकडे कसे पाहावे, श्रद्धेचे ज्ञानशास्त्रीय स्थान काय असावे आणि नैतिकता, अर्थ व मानवी मूल्यांसाठी आपल्याला देवाची आवश्यकता आहे का, या प्रश्नांना थेटपणे भिडणारे हे पुस्तक आहे.