नवरात्रौत्सवासाठी शहर सज्ज

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,नागपूर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवरात्रौत्सवासाठी शहर सज्ज
आदिशक्तीचा जागर असलेल्या शारदीय नवरात्रौत्सव ाची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या, रविवारपासून नवरात्रौत्सव सुरू होत आहे. घटस्थापना होणार आहे. या अनुषंगाने शहातील देवी मंदिरांमध्ये अखंड ज्योतसह विविध धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले आहे. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा, नागपूरची ग्रामदेवी अशी ओळख असलेले आग्याराम मंदिर आणि पारडी येथील भवानी मंदिरांमध्ये भाविकांना दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रौत्सव होय. शारदीय नवरात्रौत्सवाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थन आहे. शक्तीचे प्रतीक असलेल्या आदिमायेला वंदन करण्याचा हा सण यंदा धूमधडाक्यात होणार आहे. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर, आग्याराम देवी मंदिर, पारडी येथील भवानी मंदिर, सुभाष मार्गावरील गीता मंदिर, प्रतापनगरातील दुर्गा मंदिर तसेच लहान-मोठ्या मंदिरांमध्ये तयारी पूर्ण झाली आहे.
यावर्षी मोठ्या प्रमाणात अखंड ज्योतसाठी बुकिंग होत असल्याची माहिती विविध मंदिरातील पदाधिकाऱ्यांनी दिली. विशेषतः भोसलेकालीन आग्याराम देवी मंदिरात अखंड ज्योतसाठी मोठा डोम तयार करण्यात आला आहे. पारडी येथील भवानी मंदिरात गेल्या काही वर्षांत भाविकांची गर्दी वाढली आहे. त्या दृष्टीने भाविकांची गैरसोय होऊ नसे, यासाठी मंदिर प्रशासन संपूर्ण काळजी घेत आहे. मंदिर परिसरात जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शेजारी असलेल्या खुल्या मैदानावर नऊ दिवस गरबा रंगणार आहे. गीता मंदिरात संपूर्ण नऊ दिवस धार्मिक उपक्रम होणार आहेत. कोराडी मंदिरात दररोज भाविकांसाठी महाप्रसाद वाटप राहणार आहे.

कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवीच्या मूळ स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी भाविक गर्दी करतात. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ ते ९ वाजतादरम्यान देवीच्या मूळ स्वरूपातील दर्शन घेण्याचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठण स्पर्धा

विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पौरोहित्य आयाम (नागपूर महानगर) आणि आग्याराम देवी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत गणेशपेठ येथील आग्याराम देवी मंदिरात महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ वर्षांवरील महिलांच्या मंडळांसाठी आयोजित या स्पर्धेत प्रत्येक संघात ५ श्लोकांचे (पहिला अनिवार्य आणि चार ऐच्छिक) सादरीकरण ५ मिनिटांत करायचे आहे. प्रथम क्रमांकास ५,००१ रुपये, द्वितीय क्रमांकास ३,५०१ रुपये, तृतीय क्रमांकास २,५०१ रुपये आणि १,००१ रुपयांची चार उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चैताली खटी, श्रद्धा पाठक, सारिका येवले आणि ममता चिंचवडकर यांनी केले आहे.