दोहा विमानसेवा होणार बंद

Contributed by: नागपूर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दोहा विमानसेवा होणार बंद
विस्ताराच्या मोठ्या योजना आणि प्रवासी सुविधा वाढवण्याची तयारी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे नागपूरची आंतरराष्ट्रीय एअर कनेक्टिव्हिटी मात्र दिवसेंदिवस आकसताना दिसत आहे. येत्या २३ ऑक्टोबरपासून नागपूर-दोहा ही थेट विमानसेवा बंद होत आहे. ही सेवा बंद झाल्यास नागपूरहून परदेशासाठी केवळ एअर अरेबियाची शारजाह-नागपूर- शारजाह ही एकमेव थेट उड्डाणसेवा शिल्लक राहणार आहे.

कतार एअरवेजची दोहा-नागपूर-दोहा सेवा आठवड्यातून चार दिवस असते. सध्याच्या वेळापत्रकानुसार २२ ऑक्टोबरला दोहा येथून नागपूरसाठी आणि २३ ऑक्टोबरला नागपूरहून दोहासाठी शेवटचे उड्डाण होईल. यानंतर मार्च २०२७ पर्यंत ही सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. दोहा हे युरोप, मध्य-पूर्व आणि इतर आंतरराष्ट्रीय देशांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठे इंटरनॅशनल हब आहे. दोहा हवाईमार्ग बंद झाल्याने नागपूरकर प्रवाशांना आता युरोप व इतर देशांत जाण्यासाठी मुंबई, दिल्ली, हैदराबाद किंवा बेंगळुरू यांसारख्या शहरांमधून कनेक्टिंग फ्लाइट पकडावी लागेल. यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढणार आहे.
सध्या नागपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलसह इतर सोयी-सुविधा वाढवून क्षमता विस्ताराचे मोठे काम सुरू आहे. नागपूरला मोठे नागरी विमान वाहतूक केंद्र बनवण्याची योजना असली तरी केवळ धावपट्टी व टर्मिनल वाढवून चालणार नाही. त्यासोबत आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे जाळे वाढवणेही गरजेचे आहे. नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग न जोडल्यास नागपूरचा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दर्जा केवळ नावापुरताच उरेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.