देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या आणि त्यांच्या विविध समस्यांवर गांभीर्याने विचारमंथन करण्यासाठी वरिष्ठ नागरिक परिसंघाच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांची द्विदिवसीय बैठक ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे पार पडली. यावेळी ज्येष्ठांना सहानुभूतीची नव्हे आधार व सन्मानाची गरज आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
अखिल भारतीय बैठकीच्या अध्यक्षपदी परिसंघाचे तेलंगण प्रदेशाध्यक्ष जयंद्र गौड होते. मंचावर परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी रमण, राष्ट्रीय महामंत्री चंद्रकांत देशपांडे, तेलंगणा प्रदेश संघटन मंत्री राम मोहन, भारतीय मजदूर संघाचे विशेष केंद्रीय प्रतिनिधी चन्ना केशवराव तसेच माजी अखिल भारतीय महामंत्री वसंत पिंपळापुरे उपस्थित होते. या बैठकीत देशभरातील सोळा राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. यात नागपूरहून राष्ट्रीय उपाध्यक्ष विवेक देशपांडे व अखिल भारतीय वित्तसचिव विनोद किन्हेकर यांचीही विशेष उपस्थिती होती.बैठकीमध्ये ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात आणि विशिष्ट रुग्णालयांची अट शिथिल करण्यात यावी. करोनाकाळात बंद झालेली रेल्वे प्रवासातील सवलत सुरू व्हावी. अल्प उत्पन्न असलेल्या लाखो ज्येष्ठांसाठी ही सवलत केवळ सुविधा नसून मोठा आर्थिक आधार आहे, ती त्वरित सुरू करावी. सप्टेंबर २०१४पासून किमान पेन्शन एक हजार रुपयांवरच स्थिर आहे. वाढत्या महागाईच्या काळात ही रक्कम अपुरी असल्याने किमान निवृत्ती वेतनात वाढ करून त्यांना महागाई भत्ता लागू करावा, आदी मागण्या करण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर परिसंघाने सातत्याने पत्रव्यवहार व आंदोलने केली असली तरी प्रश्न अद्याप कायम आहेत, अशी खंत राष्ट्रीय महामंत्री चंद्रकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.