सवंगडी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सवंगडी
गण्यात मैत्री हवीच. कधी सुख-दुःख वाटण्यासाठी, कधी भांडण्यासाठी, कधी भंकस करण्यासाठीही... मैत्री ही हवीच. मैत्रीचे छान बंध जुळणाऱ्यांसाठी शब्दही आहेत तसेच छानसे. ‘सखा’, ‘सोबती’, ‘साथीदार’, ‘भिडू’, ‘सुहृद’ वगैरे. आणि आत्ताच्या - म्हणजे ‘जेन झी’ पिढीच्या तोंडी रुळलेला शब्द - ‘ब्रो’! शब्दांची लघुलघुरूपे वापरण्याची आवड असलेल्या या पिढीचा हा शब्द आवडीचा व सवयीचा देखील. हा इंग्रजी शब्द राहू दे बाजूला. आपल्या मराठीत ‘मित्र’साठी एक छान शब्द आहे ‘ सवंगडी ’. सवे म्हणजे सोबत असणारा गडी तो सवंगडी अशी फोड या शब्दाची. ‘गडी’ या शब्दाचा एक अर्थ, मजबूत, ताकदवान माणूस असा आहे. म्हणजे, जो कुणी सवंगडी असेल तो असा भक्कम साथ देणारा ताकदवानच असणार, ही खात्रीच बाळगावी सगळ्यांनी. गडी या शब्दाचा आणखी एक अर्थ ‘नोकर’ असा असला तरी ‘सवंगडी’ शब्दात तो भाव किंचितही येत नाही. उलट या शब्दाभोवती दाटून असलेला अर्थ व भाव आहे प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि घट्ट विश्वासाचा. ‘हरी तू आमुचा रे सवंगडी...’ म्हणत साक्षात श्रीकृष्णाशी मित्र करण्याची ताकद दिसते या शब्दात. ‘शिवबाचे सवंगडी...’ हा पोवाडा देखील माहीत असेल अनेकांना. स्वराज्यासाठी लढणारे मावळे शिवरायांचे ‘मित्र’ नव्हते, तर ते त्यांच्या जिवाला जीव देणारे ‘सवंगडी’ होते. यावरून या शब्दाच्या अर्थाची खोली व व्याप्ती कळून यावी. हे तर सोडाच, आपल्या तुकाराम महाराजांनीदेखील हा शब्द त्यांच्या अभंगात फार आंतरिक जिव्हाळ्याने योजिलेला दिसतो. ‘आम्ही हरीचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे...’ या त्यांच्या अभंगात ‘सवंगडी’ ऐवजी ‘सवंगडे’ असा शब्दप्रयोग असला तरी त्याचा अर्थ तोच. अर्थात, साक्षात हरी आमचा जुना सवंगडी आहे, असे म्हणण्याचा भरभक्कम अधिकार तुकोबांकडे होता, हे निःसंशय. कित्येक शतके जुना असा हा शब्द आपण विसरत चाललो आहोत की काय अशी शंका येते कित्येकदा. ही शंका नाहीशी करायची असेल तर ‘जेन झी’सकट सगळ्यांनीच हा शब्द अधिकाधिक वापरायला हवा...!

सवंगडी