Visit Of Seychelles National Youth Council Delegation To Nagpur
सेशेल्स राष्ट्रीय युवा परिषदेच्या शिष्टमंडळाची भेट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर : भारत आणि सेशेल्स या दोन देशांमधील युवा मुत्सद्देगिरीला बळकटी देण्याच्या उद्देशाने सेशेल्स राष्ट्रीय युवा परिषदेच्या शिष्टमंडळाचा तीन दिवसीय नागपूर दौरा पार पडला. फुटाळा तलाव येथील महाराष्ट्र नौदल युनिट एनसीसीला भेट देऊन या दौऱ्याची सांगता झाली. या दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाने एनसीसी ग्रुप मुख्यालयाला भेट देऊन राष्ट्रउभारणीत एनसीसीच्या भूमिकेविषयी माहिती घेतली. यासोबतच महाराष्ट्र आर अँड व्ही स्क्वाड्रन येथे घोडदळ प्रशिक्षण, महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन येथे ड्रोन व्यवस्थापन व आधुनिक प्रशिक्षण पद्धती आणि नौदल युनिटच्या सागरी प्रशिक्षण उपक्रमांची पाहणी केली. फुटाळा तलाव येथे प्रतिनिधींनी एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधला आणि नौकाविहाराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. एनसीसीच्या या प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण पद्धतीचे सेशेल्सच्या शिष्टमंडळाने कौतुक केले असून आपल्या देशातही अशाच प्रकारचे युवा उपक्रम राबवण्याची इच्छा व्यक्त केली.