ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासह नागरिकांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी अंबरनाथ पंचायत समिती आणि तालुक्यातील ग्रामपंचायतींना अचानक भेट देत कामकाजाची तपासणी केली. तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
१३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या दौऱ्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे आणि गटविकास अधिकारी अजित देसाई उपस्थित होते. पंचायत समितीतील विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी करताना सेवानिवृत्तीविषयक प्रलंबित प्रकरणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीत निदर्शनास आलेल्या त्रुटींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यादव यांनी दिले.ग्रामपंचायत आंबेशिव येथे जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तसेच खुल्या आणि बंदिस्त व्यायामशाळांची पाहणी करण्यात आली. उपलब्ध सुविधांचा प्रभावी वापर, स्वच्छता आणि लोकसहभाग वाढविण्यावर त्यांनी भर दिला.