यशस्वीनगर हायलँड सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीस पाच लाखांचा धनादेश दिला.
या उत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, मंडळाचे अध्यक्ष नीलेश पाटील धार्मिक आणि सामाजिक भान राखत नवरात्रोत्सवात विविध उपक्रम राबवत असतात. यंदाही भव्य दिव्य स्वरूपात उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सुभाष भोईर आदी उपस्थित होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. त्यांना आवश्यक आर्थिक मदत केली जाईल आणि योजना राबविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.