शाळेच्या भिंतीवर गिर्यारोहणाचा थरार!

Contributed by: ठाणे,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
शाळेच्या भिंतीवर गिर्यारोहणाचा थरार!
डोंगरकडे, कातळकडे आणि हिमशिखरांवर चढाई करण्याचा थरार अनुभवण्यासाठी ठाणे-मुंबईतील साहसवीरांना लांब जाण्याची गरज नाही. आता ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या शाळेमध्येच २४ फूट उंच कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत उभारण्यात आली आहे. शनिवारी या बंदिस्त जागेतील प्रस्तरारोहणाचा अनुभव देणाऱ्या परिसरातील पहिल्या भिंतीचे गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

कृत्रिम प्रस्तरारोहणाचा ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश झाला असताना, या खेळाला शालेय स्तरावर प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र गिर्यारोहण संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी यावेळी केले. सरस्वती मंदिर ट्रस्टने उभारलेल्या या भिंतीचे उद्घाटन एव्हरेस्टसह अनेक अतिउंच हिमालयीन मोहिमांचे यशस्वी नेतृत्व केलेल्या उमेश झिपरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शालेय शिक्षणात गिर्यारोहणाचा साहसी आणि स्पर्धात्मक खेळ म्हणून समावेश करण्यात आला असून, बालभारतीच्या नवीन पाठ्यपुस्तकांतूनही विद्यार्थ्यांना या खेळाची ओळख करून दिली जाणार आहे. त्यामुळे अशा सुविधा उभारणे ही काळाची गरज असल्याचे झिरपे यांनी नमूद केले.
नेहरू पर्वतारोहण संस्थेचे माजी उपप्राचार्य आणि भारतीय सैन्यातील अनुभवी गिर्यारोहक निवृत्त कर्नल योगेश धुमाळ यांनीही या भिंतीवरून आरोहणाचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना धुमाळ यांनी गिर्यारोहणातून केवळ साहसच नव्हे, तर शिस्त, आत्मविश्वास आणि सांघिक भावना विकसित होत असल्याचे सांगितले.

ही भिंत उभारण्यासाठी मुख्य मार्गदर्शक चारुहास जोशी यांच्यासह मंगेश जोशी, मंदार गुप्ते, अनिल उंडे, राहुल पेंडसे, सुनील उंडे, किरण सावंत आणि प्रणय पाटील यांनी सहकार्य केले. सरस्वती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी क्रीडा केंद्राच्या वाटचालीचा आढावा घेतला.

२४ फूट उंची, २५० होल्ड्स

या कृत्रिम प्रस्तरारोहण भिंतीची रुंदी २४ फूट असून, उंचीही २४ फूट आहे. भिंतीवर चढाईसाठी सुमारे २५० होल्ड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एव्हरेस्टवीर विवेक शिवादे यांनी या भिंतीवर प्रथम आरोहण करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे तिचे उद्घाटन केले. क्रीडा केंद्राच्या संकुलातील इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, पुढील महिन्यापासून केंद्र सुरू होणार आहे. जिम्नॅस्टिक्स, रिदमिक जिम्नॅस्टिक्स, क्रिकेट, बास्केटबॉलसह स्केटिंग, मल्लखांब आणि पिकलबॉल या खेळांचाही समावेश करण्यात येणार आहे. नागरिकांना शनिवार आणि रविवारी क्रीडा केंद्राचा लाभ घेता येणार आहे.