महावितरणच्या भरारी पथकाने तळोजा एमआयडीसी परिसरातील एका बर्फाच्या कारखान्यावर धाड टाकून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आणली आहे.
या कंपनीने तब्बल १६ लाख ५६ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आल्याने कंपनीच्या मालकाविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तळोजा एमआयडीसीतील खेरणे येथील प्लॉट क्रमांक एम-२६ येथे असलेल्या मे. नासा इंडस्ट्रीज या बर्फाच्या कारखान्यात विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे वीज वापर सुरू ठेवण्यात आला होता. गत जुलै महिन्यात महावितरणच्या भरारी पथकाने या कारखान्यावर छापा मारून येथील वीजचोरी उघडकीस आणली होती. या कंपनीने बाह्य स्रोत उपकरणाच्या साहाय्याने महावितरणचे वीज मीटर वारंवार बंद करून वीजचोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कंपनीने ६ फेब्रुवारी ते ३० जुलै २०२६ या कालावधीत तब्बल ८२ हजार ६११ केव्हीएएच युनिट्स एवढी वीज चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे महावितरणचे तब्बल १६ लाख ५६ हजार ३२० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले. त्यानंतर महावितरणने या कंपनीला वीजचोरीचे देयक आणि तडजोड रक्कम भरण्यास सांगितले होते. मात्र, कंपनीकडून कोणतीही रक्कम भरण्यात आली नाही.
अखेर महावितरणने या कंपनीवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत कंपनी मालक जिथीन जोसेय कानाफ्पली याच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वीजचोरी करणाऱ्या उद्योजकांवर महावितरणने केलेल्या या कठोर कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.