In depth Analysis Of Investment And Financial Performance In The Distillery Industry
डिस्टिलरी उद्योग आणि गुंतवणूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड आणि रॅडिको खेतान लिमिटेड या दोन्ही कंपन्यांची आर्थिक कामगिरी , व्यवसायातील घडामोडी, मूलभूत आर्थिक स्थिती आणि समभागांच्या किमतीतील तांत्रिक संकेत यांचा आढावा घेऊया.
अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लि.कंपनी अल्कोहोलयुक्त पेयांचे उत्पादन, विपणन आणि विक्री करते.
भागधारकता : प्रवर्तक ८०.९१%, सार्वजनिक गुंतवणूकदार १०.७७%, म्युच्युअल फंड ३.५०% आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार ३.२४%.
आर्थिक उत्पन्न : मागील बारा महिन्यांत एकूण आर्थिक उत्पन्नात १.४% वाढ होऊन ३.८९ हजार कोटी रुपये झाले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निव्वळ उत्पन्न २०.१% वाढून ४९.२२ कोटी रुपये झाले आहे.
व्यावसायिक कामगिरी : कंपनीला सप्टेंबर महिन्यात तेलंगणातील रंगपूर प्लांटमध्ये वार्षिक ४.४ दशलक्ष बीएल माल्ट स्पिरिट तयार करण्याचा परवाना मिळाला आहे. यामुळे कंपनीला आपल्या प्रीमियम व्हिस्कीसाठी लागणारा कच्चा माल स्वतः तयार करता येणार आहे.
मूलभूत दृष्टिकोन : कंपनीची पाच वर्षांची चक्रवाढ विक्री दरवाढ ११% आणि पाच वर्षांतील चक्रवाढ नफा दरवाढ १४७% आहे.
तांत्रिक दृष्टिकोन : कंपनीच्या समभाग किंमतीत मागील तीन महिन्यांत २१% हून अधिक वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, समभाग किंमतीत अजून तेजी दिसण्याची शक्यता आहे. समभाग किंमतीचा एक वर्षाचा बीटा १ आहे. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी समभाग किंमतीत होणाऱ्या अचानक बदलाबाबत विशेष काळजी घ्यावी. समभाग किंमतीचा १०० दिवसांचा सरासरी स्तर ६३५ रुपये आहे. समभाग किंमतीत ८०५ रुपये स्तरावर नफावसुली येण्याची शक्यता अधिक आहे. समभाग ७३५ रुपयांपर्यंत घसरल्यास पुन्हा एकदा भागखरेदीचा ओघ वाढेल.
रॅडिको खेतान लिमिटेड
कंपनीची स्थापना २१ जुलै, १९८३ रोजी झाली. ही कंपनी भारतातील इंडियन मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल) च्या सर्वांत जुन्या आणि सर्वांत मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीने १९४३ मध्ये आपले कामकाज सुरू केले. ही कंपनी पूर्वी 'रामपूर डिस्टिलरी कंपनी' म्हणून ओळखली जात होती. कंपनीचा मद्य उत्पादन, विपणन आणि विक्री व्यवसाय जागतिक बाजारपेठेत पसरलेला आहे.
भागधारकता : प्रवर्तक ४०.१७%, म्युच्युअल फंड २१.४०%, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार १९.४३% आणि सार्वजनिक गुंतवणूकदार १३.२२%.
आर्थिक उत्पन्न : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण उत्पन्न १२% वाढून १.६८ हजार कोटी रुपये झाले. मागील बारा महिन्यांत आर्थिक उत्पन्नात २.९% वाढ होऊन ६.२३ हजार कोटी रुपये झाले. पहिल्या तिमाहीत निव्वळ उत्पन्न २७.९% वाढून २२९.६० कोटी रुपये झाले.
व्यावसायिक कामगिरी : सध्या बाजारात कंपनीचे जांभळाच्या चवीचे मद्य अत्यंत लोकप्रिय झाले आहे. म्हणून कंपनीने जांभळाच्या चवीचे मद्य (जीन आणि व्होडका) उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २२२.४३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि १,६८३.६९ कोटी रुपयांच्या महसूल मिळवला आहे.
मूलभूत दृष्टिकोन : कंपनीची पाच वर्षांची चक्रवाढ विक्री दरवाढ २१% आणि पाच वर्षांतील चक्रवाढ नफा दरवाढ १७% आहे.
तांत्रिक दृष्टिकोन : कंपनीच्या समभाग किंमतीत तेजी असल्यामुळे ऑगस्ट महिन्यात ‘निफ्टी मिडकॅप १५०’ मधील सर्वाधिक वाढ झालेल्या कंपन्यांच्या यादीत समावेश झाला. मागील सहा महिन्यांत समभाग किंमतीत ४०% हून अधिक वाढ झाली आहे. समभाग किंमतीचा एक वर्षाचा बीटा ०.८० आहे. समभाग किंमतीचा १०० दिवसांचा सरासरी स्तर ४,२०४ रुपये आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक तिमाही निकालांसाठी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. या कालावधीत समभागा किंमतीत ४,५७५ रुपये स्तरावर तात्पुरती नफावसुली येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. दीर्घकाळ गुंतवणूकदारांनी ५,२०० रुपये स्तरावर नफावसुली करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.