बाजाराने गेल्या काही दिवसांत कल बदलला असला, तरी बाजारात तेजीचा उत्साह मात्र दिसून येत नाहीये. निर्देशांकात जरी वाढ होताना दिसली, तरी त्याचा कुठलाच सकारात्मक परिणाम गुंतवणुकीवर किंवा परताव्यात दिसून येत नाहीये. त्याच जोडीला राजधानीत तसेच वेगवेगळ्या राज्यांत चाललेली आंदोलने यामुळे अस्थिर वातावरणात बाजार फार काही दिशा दाखवेल असे सध्यातरी वाटत नाही. त्यामुळे ‘वेट अँड वॉच’ अशीच स्थिती पुढील काही काळ राहील, असे सध्यातरी वाटते आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या सर्वांची दखल घेत मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अनुक्रमे ७४,७२९ (+४१३) व २३,१४६ (+१४८) असा सकारात्मक बंद झाला.
सिंगापूरमध्ये असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कररचनेतील सुधारणांबद्दल काही सूतोवाच केले आहे. त्यांची मागील कामगिरी पाहता त्यांना सध्या चुकांची जाणीव होत असावी अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर रेंगाळलेले अमेरिका, ब्रिटन (यूके) आणि कॅनडा यांच्या बरोबरचे व्यापार करार अमेरिकेचे अध्यक्ष देत असलेल्या टेरिफ धमक्या आणि जागतिक अस्थिर परिस्थिती, देशावरील दुष्काळाचे सावट याही गोष्टी येत्या काळात बाजाराला दिशादर्शक राहतील, अशी सध्या परिस्थिती आहे.त्याचवेळेस पुढील काही दिवसांत येऊ घातलेला रिलायन्स जिओचा आयपीओ मोठी भांडवल उभारणी बाजारातून करणार आहे. या आयपीओविषयी सर्वत्र एक आकर्षण दिसून येत आहे. एका मोठ्या समूहातील कंपनीचा आयपीओ म्हणून यात गुंतवणूक करताना सर्व बाबींची चौकशी, पडताळणी करूनच गुंतवणूक करा. कोणत्याही आयपीओसाठी गुंतवणूक करताना आयपीओतून संबंधित कंपनीकडे जमा होणारे भांडवल ती कंपनी कशाप्रकारे वापरणार आहे हे पाहणे फार महत्त्वाचे असते. याला अर्थातच जिओसुद्धा अपवाद नाही. कंपनीचा पूर्वेतिहास तपासून पाहताना भावी काळातील कंपनीने ठरवलेली वाटचालही नजरेखालून घालणे आवश्यक असते. गुंतवणूकदारांनी भावनिक न होता व्यावहारिक गोष्टी पाहून निर्णय घ्यावा.
मागील काही काळातील नवीन समभाग सध्या काय परतावा देत आहेत हेही बघून घ्यावे. त्याऐवजी जुने चांगले समभाग चांगल्या किंमतीत मिळत असतील तर त्याला प्राधान्य द्यावे. त्यानुसार, सोबतच्या तक्त्यात आज काही समभाग सुचवत असून आपल्या सल्लागाराची मदत घेऊन त्यात गुंतवणूक करावी.
एकंदरीतच सध्या या ओळींसारखी बाजारात परिस्थिती आहे. सोमवारी उघडणारा बाजार पुढील आठवड्यासाठी मार्गदर्शक राहील. बाजारातील कार्य प्रणालीत (कॅॅस सिस्टम) मध्ये वारंवार केले जाणारे बदल गुंतवणूकदारांच्या जोखीम दृष्टीने बरोबर जरी असले तरी बाजारातील चढउताराची काम करण्याची मजा घालवत आहेत.
त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिक त्रस्त असून गुंतवणूक स्नेही राहणे त्यांना कठीण जात आहे. त्यामुळे हे आणि इतर आव्हान बाजार झेलेल, अशी अपेक्षा ठेवूया आणि बाजार कधी तेजी घेतो याकडे पाहूया .