दुर्घटनेनंतर राजकारण तापले

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,ठाणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दुर्घटनेनंतर राजकारण तापले
आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाच्या कामादरम्यान उड्डाणपुलाचा खांब उभारण्यासाठी वापरण्यात येणारा तब्बल १२ टन वजनाचा लोखंडी सांगाडा अचानक कलला. हा महाकाय सांगाडा धावत्या कारवर कोसळून कारचालक आणि प्रवासी किरकोळ जखमी झाले. यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत टीकेची झोड उठवण्यात आली. याबाबत काँग्रेसने संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुंबईहून ठाण्याच्या दिशेने आनंदनगर जकात नाकामार्गे येणारी वाहतूक मुंबई-नाशिक महामार्गावर खोळंबून न राहता साकेतच्या दिशेने सुरळीतपणे मार्गस्थ व्हावी, यासाठी आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाचे काम शहरात प्रगतीपथावर आहे. याच कामाचा भाग म्हणून नौपाडा-भास्कर कॉलनी परिसरातील कोपरी पुलावर प्रकल्पाचे खांब उभारले जात आहेत.
दुर्घटना घडताच शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि स्थानिक विभागप्रमुख किरण नाकती घटनास्थळी दाखल झाले. संबंधित ठेकेदाराकडून निष्काळजीपणे काम सुरू आहे. चारचाकी वाहन असल्याने दुर्घटना टळली; अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती, अशी भीती म्हस्के यांनी व्यक्त केली.

संरचनात्मक तपासणी करा

प्रचंड मोठा लोखंडी सांगाडा थेट चालत्या कारवर कोसळणे ही केवळ तांत्रिक चूक नसून, कंत्राटदार आणि संबंधित देखरेख अधिकाऱ्यांचा अत्यंत बेजबाबदारपणा आहे. यापूर्वीच्या दुर्घटनांनंतरही सुरक्षा उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी उपस्थित केला आहे. केवळ कंत्राटदाराला आर्थिक दंड ठोठावून चालणार नाही. निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर आणि या कामावर देखरेख ठेवणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संरचनेची तपासणी करावी आणि अपघाताच्या मूळ कारणाचा शोध लागल्याशिवाय कोणतेही काम सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी पिंगळे यांनी केली.