शिवसेना-भाजप आमनेसामने

Contributed by: म. टा. वृत्तसेवा,कल्याण|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
शिवसेना-भाजप आमनेसामने
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आठ महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रभाग समिती सभापती पदाच्या १० जागांसाठी १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून १० पैकी सात जागांवर, भाजपने सहा जागांवर, मनसे आणि उबाठाकडून प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादीकडून एक अर्ज दाखल करण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना -भाजप युती असतानाही दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने युतीत वरवर जरी आलबेल दिसत असले, तरी अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले. दरम्यान, काही जागांवर दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल करण्यात आले असले, तरी चर्चा करून हे पद कोणाला द्यायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.
शिवसेनेकडून सात जागांवर अर्ज दाखल करताना दोन जागा मनसेसाठी सोडण्यात आल्या आहेत. तर भाजपने सहा जागांवर अर्ज दाखल केले आहेत. अ, ड, फ आणि जे या चार प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध झाली आहे.

अ प्रभागातून शिवसेना शिंदे गटाचे बंदेश जाधव, ब प्रभागातून उबाठाच्या स्वप्नाली विनोद केणे आणि शिवसेनेच्या सुप्रिया भोईर यांनी अर्ज दाखल केले आहेत. क प्रभागातून भाजपच्या मेघाली खेमा, शिवसेनेकडून प्रतीक पेणकर, तर राष्ट्रवादीकडून रमीझ मनियार यांनी अर्ज दाखल केले आहेत. ड प्रभागातून मनसेच्या शीतल मंडारी, जे प्रभागातून दर्शना काळे, तर फ प्रभागातून मंदा पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत.

ह प्रभागातून भाजपच्या रवीना म्हात्रे, मनसेचे संदेश पाटील आणि शिवसेनेच्या रेखा म्हात्रे यांनी अर्ज दाखल केले आहेत. ग प्रभागातून कविता मिलिंद म्हात्रे आणि शिवसेनेचे सूरज मराठे, तर आय प्रभागातून भाजपच्या सरोज राय आणि उबाठाचे नीलेश खंबायत यांनी अर्ज दाखल केले आहेत. ई प्रभागातून भाजपच्या रवीना माळी आणि शिवसेनेकडून अर्जुन भोईर यांनी अर्ज दाखल केले आहेत. एकूण सहा प्रभागांत भाजपविरोधात शिवसेना, असे अर्ज दाखल झाले आहेत.