अमली पदार्थ विक्रीत महिलांचा सहभाग

Contributed by: म. टा. वृत्तसेवा,अंबरनाथ|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
womens involvement in drug dealing in ambernath police action taken
पोलिस आयुक्तालय परिमंडळ ४मध्ये अमली पदार्थविरोधी सुरू असलेल्या धडक कारवाईमध्ये पोलिसांकडून रोज लाखो रुपयांचे ड्रग्स आणि गांजा जप्त केला जात आहे. मात्र या गुन्ह्यांत महिलांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. अंबरनाथ पोलिसांनी जवळपास सात किलो गांजा जप्त केला असून तीन महिलांना नुकतीच अटक केली आहे.

परिमंडळ ४मधील अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांना अमली पदार्थांचा विळखा पडत चालला आहे. या विरोधातील मोहिमेत अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये नियमित कारवाई केली जात आहे. यापूर्वी अमली पदार्थविरोधी कारवाईमध्ये काही महिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. याच आठवड्यात बदलापूर येथील घरात एक केमिकल इंजिनिअर एमडी ड्रग्स तयार करत असल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात प्रवास करणाऱ्या दोन तरुणांच्या बॅगेत १४ किलो गांजा आढळला होता. ही घटना ताजी असतानाच अंबरनाथ पोलिसांच्या गुड मॉर्निंग पथकाला वांद्रापाडा परिसरात गस्त घालताना दोन महिला संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता सात किलोपेक्षा अधिक वजनाचा गांजा, डिजिटल वजनकाटा आणि इतर साहित्य आढळून आले.
या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शकुंतला तिडंगे (६०), ज्योती तिडंगे (३९) आणि वच्छला तिडंगे यांना अटक केली आहे. त्यांना २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अमली पदार्थांविरोधात कारवाया सुरू राहणार असून, कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा अंबरनाथ विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिला आहे.