हवाई दलप्रमुखांची अखेरची उड्डाणफेरी

Contributed by: नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
हवाई दलप्रमुखांची अखेरची उड्डाणफेरी
निवृत्तीला काहीच दिवस शिल्लक असताना भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी मंगळवारी तेलंगणातील दुंडीगल येथील एअर फोर्स ॲकॅडमीमध्ये एचजेटी-१६ किरण मार्क-१ प्रशिक्षण विमानातून आपली अखेरची उड्डाणफेरी पूर्ण केली. ५५ मिनिटांच्या या उड्डाणानंतर त्यांनी ही वर्दीतील शेवटची भरारी असल्याचे सांगितले.

ही भरारी विशेष ठरली, कारण सिंग यांच्यासोबत त्यांचे पहिले उड्डाण प्रशिक्षक, निवृत्त विंग कमांडर व्ही. एस. कोचर होते. यू-७०७ क्रमांकाच्या विमानातून दोघांनी उड्डाण केले. जानेवारी १९८४मध्ये याच ॲकॅडमीत किरण विमानातून कोचर यांच्यासोबत पहिले उड्डाण केल्याची आठवण सिंग यांनी जागवली आणि आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
उड्डाणानंतर एअर चीफ मार्शल सिंग यांना सन्मानार्थ वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. १९८४मध्ये ते एअर फोर्स ॲकॅडमीतून ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’सह उत्तीर्ण झाले होते. ‘ज्या विमानातून प्रवास सुरू केला, त्याच विमानातून शेवटचे उड्डाण करणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे’, असे सिंग यांनी सांगितले. ७३ वर्षीय कोचर यांनी सिंग यांना, सर्वांत तेजस्वी विद्यार्थी आणि सर्वोत्तम प्रमुख, असे संबोधत, त्यांच्यासोबत पुन्हा उड्डाण करणे स्वतःसाठीही स्वप्नपूर्ती असल्याचे म्हटले. डिसेंबर १९८४मध्ये फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त झालेले सिंग पात्र उड्डाण प्रशिक्षक आणि प्रायोगिक चाचणी वैमानिक आहेत. विविध विमानांवर हजारो तासांचा त्यांना अनुभव आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. नुकतेच त्यांनी जोधपूर येथे ‘तरंग शक्ती’ सरावादरम्यान स्वदेशी तेजस विमानातून अखेरचे लढाऊ उड्डाण केले होते.