मिझुहो पार्क ॲथलेटिक्स स्टेडियमवर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ ब्राँझ अशी चौदा पदके मिळवली. यासह पॅरा ॲथलेटिक्समधील भारताची एकूण पदकसंख्या वीसवर पोचली आहे. या तक्त्यात १३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ ब्राँझ अशी एकूण २३ पदके जिंकणाऱ्या चीननंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.निषादचा पराक्रम
निषादने पुरुषांच्या उंच उडी (टी-४७) प्रकारात अव्वल स्थान पटकावले. मंगळवारी निषादने २.०४ मीटर उडी मारून नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्ण मिळवले. त्याचे हे दुसरे सुवर्ण ठरले. सोमवारी त्याने लांब उडीत सुवर्ण मिळवले होते. यासह एकाच आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण मिळवणारा तो तिसराच भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी, पॅरा-धावपटू अंकुर धामा आणि विनाहाताची तिरंदाज शीतलदेवी यांनी अशी कामगिरी केली होती एकाच आशियाई पॅरा-क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणारा केवळ तिसरा भारतीय ठरला. चीनमधील गेल्या स्पर्धेत अंकुरने पुरुषांच्या ५००० आणि १५०० मीटर शर्यतीत, तर शीतलने महिलांच्या वैयक्तिक कम्पाउंड आणि मिश्र टीम कम्पाउंडमध्ये सुवर्णपदके जिंकली होती. वयाच्या सहाव्या वर्षी गवत कापण्याच्या यंत्रामुळे निषादचा उजवा हात कापला गेला होता.
दीप्तीने सुवर्ण राखले
दिवसाची सुरुवात दीप्ती जीवनजीने भारताला सुवर्णपदक मिळवून देऊन केली. तिने महिलांच्या (टी २० कॅटेगरी) ४०० मीटर शर्यतीत ५६.३६ सेकंद वेळ नोंदवून स्पर्धा विक्रमासह सलग दुसरे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. तेलंगणाची २३ वर्षीय दीप्ती आशियाई विक्रमवीर असून, तिने २०२४ च्या पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि पॅरालिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकले आहे. टी२० कॅटेगरी बौद्धिक अपंगत्व असलेल्या ॲथलीट्ससाठी आहे. तेलंगणाच्या वारंगलमधील एका दुर्गम गावातील दीप्तीचे आई-वडील अल्पभूधारक शेतकरी आणि मजूर आहेत. तिच्या शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षकाने तिची धावण्याची प्रतिभा ओळखली. पुढे तिला बॅडमिंटन दिग्गज पी. गोपीचंद यांचा पाठिंबा मिळाला, त्यांच्या सल्ल्यानुसार तिची बौद्धिक अपंगत्वाची चाचणी घेण्यात आली होती. गावकऱ्यांच्या टोमण्यांना न जुमानता पालकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच ती आज या टप्प्यावर पोचली.
सिमरनचे सोनेरी यश
अनुभवी धावपटू सिमरनने महिलांच्या (टी१२) २०० मीटर शर्यतीत स्पर्धा विक्रमासह पहिले सुवर्णपदक जिंकले. याच शर्यतीत भारताच्या तेजलबेन डामोरने ब्राँझ मिळवले. सिमरनने २४.८० सेकंद वेळ नोंदवून इराणच्या हाजार सफरजादेहला (२५.०२ सेकंद) मागे टाकले. तेजलबेनने २५.२३ सेकंदांसह तिसरे स्थान मिळवले. टी१२ कॅटेगरी मध्यम दृष्टिदोष असलेल्या खेळाडूंसाठी आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ब्राँझ जिंकणारी २६ वर्षीय सिमरन तिचा जुना मार्गदर्शक उमर सैफी डोपिंग बंदीत अडकल्यानंतर, आता शिवम या नवीन मार्गदर्शकासह पुनरागमन करत आहे.
भारताचा दबदबा
पुरुषांच्या (एफ५१, ५२, ५३) थाळी फेकमध्ये प्रणव सूरमाने आशियाई विक्रमासह सुवर्ण जिंकले. ३२ वर्षीय सूरमाने ११.६६ मीटर लांब थाळी फेकून आशियाई विक्रम रचला, तर ३१ वर्षीय राम रतनने १०.३५ मी. कामगिरीसह रौप्य जिंकले. हे दोन्ही खेळाडू एफ ५१ कॅटेगरीतील आहेत. या स्पर्धेत हेमामी या खेळाडूने जास्त अंतरावर थाळीफेक केली होती; परंतु वेगवेगळ्या अपंगत्व श्रेणीतील खेळाडूंच्या क्रमवारीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘रझा पॉइंट सिस्टम’मुळे सूरमा आणि राम यांना अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान मिळाले. तसेच, पुरुषांच्या थाळी फेकमध्ये (एफ४४/६४) भारतीय खेळाडूंनी तिन्ही पदके जिंकली. चार खेळाडूंच्या या स्पर्धेत देवेंद्रकुमारने ४९.७१ मीटर फेक करून सुवर्ण, राकेशने रौप्य आणि प्रदीपकुमारने ब्राँझ जिंकले. एफ ४४ आणि ६४ यात पायाने अपंग खेळाडू सहभागी होतात.






