Gold Market Experiences A Drop Of 20000 During Navratri Festival
घटत्या दराने सोने बाजारास उभारी
Contributed by: छत्रपती संभाजीनगर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पितृपक्षाच्या तुलनेत नवरात्रोत्सवात व दसऱ्याला सोन्याच्या दरात २० हजारांपर्यंत घट झाल्याचा सकारात्मक परिणाम होऊन सोने बाजारास उभारी मिळाली व उलाढाल चांगली झाल्याचे मंगळवारी (२० ऑक्टोबर) स्पष्ट झाले. दुष्काळाच्या छायेतही लग्नसराईच्या निमित्ताने व गुंतवणुकीच्या हेतूने असंख्य ग्राहकांनी मुहूर्त साधल्याचे दिसून आले. साहजिकच यंदाही सोने बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
अलीकडे पितृपक्षात दागिन्यांसाठी बुकिंग करून त्याची डिलिव्हरी नवरात्रोत्सवात किंवा दसऱ्याला घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. अर्थातच, दसऱ्याला दर वाढण्याच्या शंकेमुळे ही बुकिंग केली जाते आणि या दृष्टीने अनेक ग्राहकांनी या प्रकारची बुकिंग केल्याचे दिसून आले. मात्र यंदा पितृपक्षाच्या तुलनेत नवरात्रोत्सवात सोन्याचा दर अनपेक्षितपणे कमी झाल्याचे पाहायला मिळाले. पितृ पक्षामध्ये सोन्याचा दर प्रति तोळा एक लाख ५८ हजारांच्या घरात होता, तर हाच दर नवरात्रोत्सव काळात एक लाख ३८ हजारांपर्यंत खाली आल्याचे स्पष्ट झाले. तसेच ऐन दसऱ्याला म्हणजेच आज मंगळवारी हा दर एक लाख ४५ हजार ६०० रुपयांपर्यंत होता. साहजिकच पितृ पक्षाच्या तुलनेत नवरात्रोत्सवात हा दर सुमारे २० हजारांपर्यंत घटला आणि त्याचा परिणाम म्हणूनही नवरात्रोत्सवात उलाढाल वाढली.दरम्यान, दरात घट झाल्यामुळेही उलाढाल वाढल्याचे नमूद करीत सराफा व्यावसायिक नम्रता पुणेकर म्हणाल्या, ‘प्रत्येकाच्या घरात कधीतरीच होणाऱ्या लग्नसराईमुळे हमखास कमी-अधिक सोने खरेदी होते आणि हेच चित्र यंदाही दुष्काळी स्थितीत पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे बाहेर देशातील व तरुणाईकडून गुंतवणुकीच्या हेतूने शुद्ध सोने खरेदीचा मुहूर्त साधण्यात आल्याचे दिसून आले’, असेही निरीक्षण पुणेकर यांनी मांडले. दुष्काळी परिस्थितीमुळे १० ते १५ टक्के उलाढाल कमी दिसली, असे सांगताना शहरातील सराफा व्यावसायिक प्रणित बोथरा म्हणाले, प्रतिकुल स्थितीतही बाजारात बऱ्यापैकी उलाढाल झाली. ग्राहकांनी दागिन्यांप्रमाणेच गुंतवणुकीच्या हेतूने सोन्याच्या कॉईनची खरेदी केली, असेही बोथरा यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. आंतरराष्ट्रीय युद्धाच्या स्थितीमुळे इलेक्ट्रॉनिक चिपचा तुटवडा लक्षणीयरीत्या वाढला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून बहुतेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दरांमध्ये २२ टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली आहे. तर, मोबाइल व लॅपटॉपमध्ये हीच दरवाढ थेट ४० ते ५० टक्क्यांपर्यंत झाली आहे.