तुमच्या मदतीसाठी चोवीस तास तत्पर

Contributed by: बीड,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
तुमच्या मदतीसाठी चोवीस तास तत्पर
विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर आयोजित १८ व्या दसरा मेळावा पार पडला. विविध संत-महंतांच्या व नाथभक्तांच्या उपस्थितीत हा दसरा मेळावा झाला. आमदार सुरेश धस यांनी या वेळी दसरा मेळाव्यास संबोधित केले.

या वेळी आमदार सुरेश धस यांनी यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांशी अडचणी, चिंता आणि आगामी काळातील आव्हानांबाबत चर्चा केली. दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आर्थिक नियोजन करावे, अनावश्यक खर्च टाळावा आणि कोणत्याही परिस्थितीत हतबल होऊन चुकीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन धस यांनी केले. अडचणीत असाल, तर एक फोन सुरेश धसला करा; तुमच्या मदतीसाठी मी २४ तास तत्पर आहे. या शब्दांत शेतकरी बांधवांना यावेळी विश्वास दिला.
दुष्काळाच्या संकटात केवळ शेतकरी कुटुंबांचाच नव्हे, तर पशुधन आणि वन्यजीवांचाही विचार करणे गरजेचे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, आपण सर्वांनी एकजुटीने या परिस्थितीचा सामना करायचा आहे.

श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड हे माझ्यासाठी श्रद्धेचे आणि स्फूर्तीचे स्थान आहे. या पवित्र व्यासपीठावर राजकीय भाष्य न करता धार्मिक परंपरा आणि अध्यात्माचा सन्मान जपण्याची भूमिका कायम राहील; तसेच पुढील वर्षापासून विजयादशमीच्या आदल्या दिवशी शस्त्रपूजन करून दसरा मेळावा आयोजित करण्याचा मानस आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.