अलोट गर्दीचे सीमोल्लंघन

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अलोट गर्दीचे सीमोल्लंघन
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा येथील भवानी मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची रिघ लागली होती. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे सायंकाळी हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्री बालाजीचा रथ ओढून सीमोल्लंघन केले. ‘गोविंदा.. गोविंदा.. व्यंकटरमणा.. गोविंदा’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. रथयात्रा मार्गावर ठिकठिकाणी रेवड्यांची उधळण करण्यात आली. तर परंपरेनुसार चार ठिकाणी आरती व दोन ठिकाणी औक्षण करण्यात आले.सीमोल्लंघनानंतर भाविकांनी एकमेकांना आपट्याची पाने देत शुभेच्छा दिल्या.

शक्तीचे प्रतीक असणाऱ्या नवरात्रोत्सवाची साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी उत्साहात सांगता झाली. शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा देवीच्या यात्रेत दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठा उत्साह राहिला. भवानी मातेची सायंकाळी आरती झाली. त्यानंतर श्री बालाजी मंदिरात महाआरती करून रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. अत्यंत सुंदर रंगरंगोटी केलेल्या रथाला दोरखंड बांधण्यात आले होते. मंदिराकडून सीमोल्लंघनासाठी निघालेला रथ व श्री बालाजीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी कर्णपुरा यात्रेतील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. ठिकठिकाणी बालाजी रथावर रेवड्यांची उधळण करण्यात आली. तर परंपरेनुसार चार ठिकाणी आरती व दोन ठिकाणी औक्षण करण्यात आले. याप्रसंगी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, माजी महापौर नंदकुमार घोडले, गजानन बारवाल, संजय बारवाल, अभिजीत जीवनवाल, संतोष मरमठ, धर्मराज दानवे, संतोष दानवे यांच्यासह भाविक उपस्थित होते. पंचवटी चौकापर्यंत ही रथ यात्रा काढण्यात आली.