गेल्या दोन आयपीएल मोसमांत भरीव कामगिरी करणारा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याने गांभीर्याने घेतले आहे. न्यूझीलंड संघही त्याला अपवाद नाही. येत्या २२ ऑक्टोबरपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होत असून, टी-२० मालिकेपूर्वी वैभव सूर्यवंशीचा सविस्तर अभ्यास केल्याचे किवीज वेगवान गोलंदाज जेकब डफी याने मंगळवारी सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना डफीने आपली मते मांडली. न्यूझीलंडमधील परिस्थिती या किशोरवयीन प्रतिभावान खेळाडूसमोर आव्हान उभे करील, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.सूर्यवंशीने आपल्या फटकेबाजीने क्रिकेटप्रेमी आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक विक्रम मोडीत काढल्यानंतर जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत पदार्पण करून तो भारताचा सर्वांत युवा आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू ठरला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही; मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत १८ चेंडूंत अर्धशतक झळकावून तो पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वांत युवा खेळाडू ठरला.
ख्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हल येथे सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी न्यूझीलंडचा संघ वैभव सूर्यवंशीचा अभ्यास करत असल्याचे डफीने सांगितले.
‘वैभवच्या गुणवत्तेबद्दल आम्हाला दुमत नाही. त्याने आयपीएल अक्षरशः गाजवली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तो चेंडू अतिशय जोरात फटकावतो आणि ही आक्रमक फटकेबाजी सातत्याने करतो,’ असे डफी म्हणाला. ‘वैभव जवळपास प्रत्येक सामन्यात अडीचशेच्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करतो आणि अनेकदा तो चुकतही नाही,’ असेही डफीने नमूद केले.
‘वैभवची इंग्लंडमधील फलंदाजी आम्ही पाहिली. तेथील वातावरण आणि खेळपट्ट्या त्याच्यासाठी थोड्या वेगळ्या होत्या. त्यामुळे त्याला अडचणी आल्या असाव्यात. न्यूझीलंड दौराही त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरेल,’ असे भाकित डफीने वर्तवले.