ऋतुराजचेही शतक

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,पुणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ऋतुराजचेही शतक
दिग्विजय पाटील, अंकित बावणे यांच्यापाठोपाठ अनुभवी ऋतुराज गायकवाडने झळकवलेल्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने मंगळवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील झारखंडविरुद्धच्या लढतीत सव्वापाचशे धावांचा डोंगर उभारला. महाराष्ट्राने ५ बाद ५२७ धावांवर डाव घोषित केल्यानंतर, पाहुण्या झारखंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर १ बाद १३० धावा केल्या होत्या. आता अखेरच्या चौथ्या दिवशी झारखंडचा डाव लवकर गुंडाळून यजमान निर्णायक विजयासह बोनस गुण मिळवणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

गहुंज्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये ही चारदिवसीय लढत सुरू आहे. महाराष्ट्राने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद ४०३ धावा केल्या होत्या. यात तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे फलंदाज आणखी किती धावांची भर घालणार, याबाबत औत्सुक्य होते. सोमवारी दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अंकित १२०, तर ऋतुराज ३५ धावांवर खेळत होता. लंचपर्यंत या दोघांनी महाराष्ट्राला पाचशे धावांचा टप्पा पार करून दिला. लंच ब्रेक झाला तेव्हा ऋतुराज शतकाच्या उंबरठ्यावर होता, लंचनंतर ऋतुराजने शतक साजरे केले आणि त्यानंतर महाराष्ट्राने ५२७ धावांवर डाव घोषित केला.
संक्षिप्त धावफलक : झारखंड : पहिला डाव - सर्व बाद १६९ आणि दुसरा डाव - ४७ षटकांत १ बाद १३० (शिखर मोहन खेळत आहे ७४, उत्कर्षसिंह खेळत आहे ४५) वि. महाराष्ट्र : पहिला डाव - १५० षटकांत ५ बाद ५२७ घोषित (सचिन धस ५८, दिग्विजय पाटील १४८-२४४ चेंडूंत १६ चौकार व २ षटकार, अंकित बावणे नाबाद १६९-३५८ चेंडूंत १३ चौकार, पृथ्वी साव २१, ऋतुराज गायकवाड नाबाद १०१-१७२ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार).

ऋतुराजचेही शतक