पाचशे कोटी कोणाला दिले?

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,बीड|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
manoj jarange patils serious allegations of 500 crores have stirred significant controversy
बीड जिल्ह्यातील नारायणगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. ‘मला देण्यासाठी भाजपकडून ५०० कोटी रुपये आणल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असून, एकनाथ शिंदे, खरं सांगा, मला एवढी मोठी रक्कम दिली का?‘ असा थेट सवाल त्यांनी शिंदे यांना केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मेळाव्यात बोलताना जरांगे म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांना ‘मनोज जरांगेंना ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत’ असे सांगितले आणि भाजपकडून ते पैसे घेऊन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ते माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपच्या अंतर्गत वर्तुळातही अशी कुजबुज सुरू आहे. त्यामुळे शिंदे साहेब, आजच्या दसरा मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत या प्रश्नाचे जाहीर उत्तर द्या. जर खरोखरच मला ५०० कोटी दिले असतील, तर ‘हो’ म्हणा आणि नसतील दिले, तर तेही जाहीरपणे सांगा. भाजप तुम्हाला संपवत आहे की तुम्ही मला संपवत आहात, याचा छडा लागलाच पाहिजे. जर आपल्याला खरोखरच ५०० कोटी मिळाले असते, तर दुष्काळात अडचणीत सापडलेल्या बळीराजाला ते वाटून टाकले असते,‘ असे ते म्हणाले.
‘पाचशे कोटींची रक्कम एवढी मोठी असते की आपण आयुष्यात कधी पाच हजाराची गड्डीदेखील एकत्र पाहिली नाही,‘ असे सांगत जरांगे म्हणाले, ‘माझ्यापेक्षा माझा समाज मोठा आहे. माझ्यावर समाजबांधवांनी आरक्षणाच्या आंदोलनात हजारो कोटींची प्रेमाची फुले उधळली आहेत. माझ्या एका हाकेवर समाजातील प्रत्येकाने १०० रुपये दिले, तरी कोट्यवधी रुपये उभे राहतील.‘ आपल्याकडे या चर्चेबाबत पुरावे असून, वेळ आल्यास ते सार्वजनिक करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी राज्य शासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. पावसामुळे कापूस आणि सोयाबीनची पिके जळून गेली आहेत. अशा स्थितीत शासन केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. या ५ हजारांसाठी बँकेच्या चकरा मारण्यात आणि पेट्रोलच्या खर्चात शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरणार नाही,‘ असा संताप त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, दुष्काळी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, पिकविम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, गावनिहाय चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा मागण्या केल्या.

‘मराठा समाजाने मुलाबाळांच्या भविष्यासाठी राजकीय पक्ष आणि आमदार-खासदार वाढवण्याऐवजी आपली ताकद स्वतःच्या हितासाठी खर्च करावी, असे आवाहन जरांगे यांनी केले. जे नेते मराठा व शेतकऱ्यांच्या विरोधात गेले आहेत, त्यांना २०२९ च्या निवडणुकीत धडा शिकवून जो आपला नाही, त्याला एकही मत देऊ नका, असे ते म्हणाले; तसेच, मराठा बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि आंदोलन मजबूत करण्यासाठी येत्या २२ तारखेला तीन स्वतंत्र व्हॉट्सॲप मोबाइल क्रमांक जाहीर केले जातील, अशी माहितीही त्यांनी शेवटी दिली.