भारतीय महिलांचा धडाका कायम

Contributed by: रायपूर,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भारतीय महिलांचा धडाका कायम
माजी कणर्धार हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने मालिकेतील तिसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेवर ९२ धावांनी मात केली. यासह भारताने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले.

भारताने झिम्बाब्वेसमोर २१७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. झिम्बाब्वेकडून शार्ने मायर्स आणि बिझा यांनी झुंज दिली. मात्र, अखेरीस झिम्बाब्वेला निर्धारित २० षटकांत १२४ धावाच करता आल्या.
तत्पूर्वी, भारताच्या सलामीच्या जोडीमध्ये बदल पाहायला मिळाला. शेफालीच्या साथीला अनुष्का मैदानात उतरली. कर्णधार स्मृती मानधना फलंदाजीस आली नाही, तिने इतर खेळाडूंना संधी दिली. अनुष्काने आपल्या खेळाने प्रभावित केले. सिबांदाच्या गोलंदाजीवर ग्वांझुराने अनुष्काचा सुरेख झेल घेतला. शेफाली-अनुष्का यांनी ३२ चेंडूंत ५४ धावांची सलामी दिली. शेफालीने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवून झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला; पण आजच्या सामन्याची स्टार ठरली ती हरमनप्रीत कौर. सुरुवातीला तिने बारा चेंडूंत ११ धावा केल्या होत्या. मात्र, चौदाव्या षटकात तिने ‘टॉप गिअर’ टाकला. चौदाव्या षटकात चिगोराच्या गोलंदाजीवर दोन चौकार आणि दोन षटकार लगावून तिने वीस धावा वसुल केल्या. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई करून भारताला २१६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

संक्षिप्त धावफलक : भारत - २० षटकांत ७ बाद २१६ (शेफाली वर्मा ६९-३७ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकार, अनुष्का शर्मा २८-२० चेंडूंत ४ चौकार व १ षटकार, हरमनप्रीत कौर नाबाद ९१-४१ चेंडूंत १० चौकार व ५ षटकार, बिलव्हड बिझा ४-०-५०-३) वि. वि. झिम्बाब्वे - २० षटकांत ७ बाद १२४ (शार्ने मायर्स ६०-४९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार, बिझा ४४-५० चेंडूंत ५ चौकार, नंदनी शर्मा ४-०-१८-३).