एकत्र येऊन दुष्काळाचा सामना करा

Contributed by: म.टा. प्रतिनिधी,बीड|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
come together to combat drought pankaja mundes social appeal
दुष्काळाच्या संकटात कोणीही लहान किंवा मोठा नसतो. पाणी, चारा आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत समाजात जातीधर्माच्या भिंती उभ्या करण्याऐवजी त्या मोडून काढण्याची आणि एकजुटीने दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात केले. मंगळवारी झालेल्या या मेळाव्यात बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकरी प्रश्न आणि सामाजिक सलोख्यावर त्यांनी भावनिक व आक्रमक शैलीत भाष्य केले.

या ऐतिहासिक मेळाव्याला व्यासपीठावर माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आर्यमान पालवे, ॲड. यशश्रीताई मुंडे, मंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, अक्षय मुंदडा, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी खासदार सुजय विखे, माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार, माजी आमदार केशवराव आंधळे, माजी आमदार भीमराव धोंडे, प्रा. लक्ष्मण हाके, ॲड. मंगेश ससाने, ह.भ.प. राधाताई सानप, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले, तर महादेव जानकर, सुजय विखे आणि धनंजय मुंडे यांनीही समयोचित भाषणे केली.
पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या, ‘माझ्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला घातले तरी तुमचे उपकार फिटू शकत नाहीत. हा दुष्काळातला मेळावा आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून टंचाई परिस्थिती निवारण्यासाठी जीवाचे रान करीन. सीएसआर फंडातून चारा पोहोचवणे आणि अनुदानासाठी मी तुमची सावली बनून काम करेन. आपण सर्वांनी मिळून खोरं आणि टोपलं हातात घेऊन नदीसंवर्धनाचे काम करायचे आहे.’

तरुणाई आणि ‘जेन-झी’ पिढीचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, ‘आपल्याला अशी तरुण पिढी नको, जिच्या मनात देशाबद्दल आदर नाही. गोपीनाथ मुंडेंसारखे लोकनेते जयप्रकाश नारायणांसोबत काम करून तयार झाले होते. आता नेतृत्व ‘जेन-झी’ पिढीला करायचे आहे. आपल्याला माणसा-माणसांत किंवा धर्माच्या भिंती उभा करायच्या नाहीत, तर जाती-धर्माच्या सर्व भिंती मोडून काढायच्या आहेत.’

राजकीय आणि सामाजिक भूमिकेवर बोलताना त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. जातीपातीच्या राजकारणाला भविष्य नाही, असे सांगत शिक्षण नसलेला माणूस विचारी नसून विषारी असतो, असे त्या म्हणाल्या. पुढे घोषणा करताना त्यांनी सांगितले, ‘मी जालन्यातील आंतरवली गाव दत्तक घेतले असून, बीडमधील गावांचा विकास ज्याप्रमाणे केला, त्याच धर्तीवर आंतरवलीचा विकास करणार आहे. भाषणाच्या शेवटी त्यांनी व्यसनमुक्त समाज आणि मुलींच्या संरक्षणाचा नारा दिला. हा देश व्यसनाच्या आधीन झाला असून व्यसन सोडले पाहिजे. मी यापूर्वीचा दुष्काळ यशस्वीपणे हाताळला होता, हा दुष्काळही आपण एकत्र येऊन परतवून लावू,’असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.