‘सत्ताबदलाने परिस्थिती बदलत नाही’

Contributed by: नागपूर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘सत्ताबदलाने परिस्थिती बदलत नाही’
‘पश्चिमेकडून सर्व प्रकारच्या संस्कृती नष्ट करण्याचे वारे वाहताहेत. फ्रान्स, अल्बानिया, बांगलादेश, नेपाळ येथे जे काही घडले त्यामागे या शक्ती कार्यरत आहेत. ‘रेजिम चेंज’ने (सत्ताबदलाने) परिस्थिती बदलेल, असे त्यांना वाटते ; पण तसे यापूर्वी कधीही झाले नसून आजदेखील होणार नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ाचा विजयादशमी उत्सव रेशीमबाग मैदान येथे झाला. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशात सुरू असलेली आंदोलने, ओटीटीवर निर्बंध, व्यसनमुक्त भारत, एआयचा वाढता गैरवापर, पर्यावरणाचे संतुलन राखत आवश्यक विकास आदी मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आज जगभरात मानवी व सांस्कृतिक मूल्ये नष्ट करणारी पश्चिमेकडील आसुरी प्रवृत्ती सक्रिय आहे. प्रगत देशही त्यासमोर हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताने आपल्या सुसंस्कृतपणा, पुरुषार्थ आणि सुप्रशासनाच्या जोरावर जगात आपले स्थान निर्माण केले आहे. भारताची हीच प्रगती पाहता काही विघटनकारी शक्ती भारत, हिंदू समाज आणि संघ यांना कमकुवत करण्याचे षडयंत्र रचत असतात. अशा शक्तींना आपल्याच देशातील क्षुद्र सत्तास्वार्थी वृत्तीच्या महत्त्वाकांक्षी नेत्यांची साथ लाभत आहे.’
कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेससह विरोधी पक्षांवर ताशेरे ओढताना भागवत म्हणाले,‘आंदोलने विभाजनासाठी नव्हे तर समाधानासाठी व्हायला हवीत. आंदोलनातून समस्यांचे समाधान होण्याची शक्यता फार कमी असते. उलटपक्षी समाजाच्या उद्यमशीलतेमुळे समस्या निराकरण झाल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. तत्पूर्वी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, भारतातील इस्त्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदींची उपस्थिती होती.

राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संघावर टीकास्त्र सोडले. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या संघाची विचारधारा घटनाविरोधी असून स्त्रिया या पुरुषांची मालमत्ता असल्याचे त्यांना वाटते, अशी टीका गांधी यांनी केली. आपण स्वतः शिवशक्तीवर विश्वास ठेवणारे असल्याने संघावर टीका करण्यात आनंद वाटतो, असेही राहुल यांनी एक्सवर नमूद केले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाची प्रशंसा केली आहे. ‘परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरातील शताब्दी वर्ष विजयादशमी उत्सवादरम्यान अत्यंत प्रेरणादायी भाषण केले’, असे मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व स्वयंसेवकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आणि या संघटनेने सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक सलोख्याचे उल्लेखनीय शतक पूर्ण केले आहे, असेही मोदी यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.