लढत आहोत; मात्र हा द्वेष आपल्या मनात शिरू नये, याची काळजी घेतली पाहिजे. जे लोक आपला द्वेष करतात, त्यांच्यासारखे आपण होता कामा नये. प्रेम, करुणा आणि माणुसकी हीच आपली सर्वांत मोठी ताकद आहे’, असे ते म्हणाले. सीजेपीच्या आंदोलनाची फ्रान्समधील अशांततेशी तुलना करणाऱ्यांनाही दीपके यांनी प्रत्युत्तर दिले. भारतातील आंदोलन आणि फ्रान्समधील परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मोफत प्रसिद्धीबद्दल धन्यवाद’
दिल्लीतील पीतमपुरा परिसरात दसऱ्यानिमित्त रावणाच्या पुतळ्यांसोबत झुरळाचा भलामोठा पुतळा जाळण्याच्या तयारीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना दीपके यांनी संबंधित रामलीला समितीला उपरोधिकपणे, ‘मोफत प्रसिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद’, असा संदेश दिला.
दरम्यान, ‘पीपल अगेन्स्ट एसआयआर’ या विविध संघटनांच्या आघाडीने शुक्रवारी, २३ ऑक्टोबरला ‘पीपल मार्च टू रीक्लेम डेमोक्रसी’ या नावाने देशव्यापी मोर्चाची घोषणा केली आहे. तहसील, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर हे मोर्चे काढले जाणार असल्याचे आघाडीने म्हटले आहे.
‘एनएसयूआय’चे आंदोलन सुरूच
सीजेपीच्या आंदोलनापासून दूर राहिलेल्या काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियासह विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन पुढे सुरूच राहील, असे स्पष्ट केले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ‘एनएसयूआय’ने मंगळवारी देशव्यापी पुतळा दहन कार्यक्रम आयोजित केले होते.
सौरव दास, रांका यांची न्यायालयात धाव
नवी दिल्ली : जंतर मंतर आंदोलन प्रकरणात न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याच्या आदेशाला ‘सीजेपी’चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, रात्रीच सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या दोघांची न्यायालयीन कोठडी २१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. ‘दोन्ही आरोपींचे वर्तन कायद्याप्रती कोणताही आदर दर्शवत नाही आणि परवानगी रद्द केलेल्या भागात निषेध आंदोलन करण्याची त्यांची सवय प्रतिबिंबित करते,’ असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते. या दोन्ही नेत्यांना आधी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी त्यात आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली होती.