Eknath Shindes Warning To Uddhav Thackeray We Will Disperse Your Plans
‘तुमचे मनसुबे उधळणार’
Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘जनतेने तुम्हाला तीन वेळा उखडून टाकले आहे. यापुढेही तुमचे मनसुबे उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांना दिला. ‘तुमच्या पक्षातील रेजिम बदलले, ते तुम्हाला कळलेही नाही’, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला.
निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि ‘मतचोरी’च्या आरोपांवरून शिंदे यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ‘निवडणुकीत विजय मिळाला की ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला की ईव्हीएम खराब, अशी भूमिका घेतली जाते’, अशी टीका त्यांनी केली. मतदारयाद्यांमधील नोंदींची पडताळणी सुरू असल्याचा उल्लेख करत विरोधकांची भूमिका सोयीप्रमाणे बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला.कर्जमाफीवरून विरोधकांना प्रश्न
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिंदे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. विरोधक ३२ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीच्या नियोजनाचा उल्लेख करतात, पण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले, असा प्रश्न शिंदे यांनी केला. शेतकऱ्यांच्या अडचणींची प्रत्यक्ष माहिती न घेता टीका केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘आरोपांना उत्तर आरोपांनी नव्हे, तर कामातून देऊ’, असे सांगत शेतकऱ्यांना मदत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
न्या. डावरे शिवसेनेत
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत डावरे यांचा पक्षप्रवेश झाला. सरकारी वकील अविनाश खामकेडकर यांनीही पक्षप्रवेश केला.