आंग्रे घराण्याचे परंपरेनुसार शस्त्रपूजन

Contributed by: म. टा. वृत्तसेवा,अलिबाग|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
आंग्रे घराण्याचे परंपरेनुसार शस्त्रपूजन
मराठा आरमाराचे सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या पराक्रमाचा वारसा जपणाऱ्या आंग्रे घराण्याची साडेतीनशे वर्षांहून अधिक काळाची विजयादशमी आणि शस्त्रपूजनाची परंपरा यंदाही कायम राहिली. कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीतील वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे यांनी आपल्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने कुटुंबासाह शस्त्रपूजन केले. सायंकाळी सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याचा कार्यक्रमही झाला.

शस्त्रपूजनात कान्होजीराजे आंग्रे यांच्या वापरातील धोप, विविध प्रकारच्या तलवारी, दांडपट्टे, गुर्ज, कट्यारी, भाले, जांबिये, परशू, गुप्त्या आणि ढालींचा समावेश होता. व्यायामासाठी वापरल्या जाणाऱ्या मुद्गलांसह परवाना प्राप्त आधुनिक अग्निशस्त्रांचेही पूजन करण्यात आले. दमास्कस आणि टोलेडो पोलादाच्या तलवारींना या ऐतिहासिक शस्त्रांमध्ये विशेष महत्त्व आहे. कान्होजीराजे यांच्या युद्धातील वापरातील ‘तोफ’ या तलवारीचेही ऐतिहासिक महत्त्व आहे. दमास्कस पोलादापासून बनविलेल्या या तलवारीचे वजन सुमारे पाच किलो ३०० ग्रॅम आणि लांबी ४० इंच असल्याचे सांगितले जाते. सोन्याची मूठ असलेल्या औपचारिक तलवारीचाही पूजनात समावेश होता. पूर्वजांचा पराक्रम, मराठा आरमाराचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही परंपरा जतन करत असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले.